भारताचा शेजारी असलेल्या श्रीलंकेत महागाईने आकाशाला गवसणी घातल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेतील इंधन दरवाढीमुळे तेथील आर्थिक संकट समोर आले होते. आता, दैनंदीन जीवनात लागणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचं संकट ओढावलं आहे. श्रीलंकेतील Advocata Institute ने महागाई संदर्भातील आकडेवारी जारी केली आहे. त्यानुसार, खाद्यपदार्थांच्या किंमतीत 15 टक्के वाढ झाल्याचे सांगण्यात आलंय.
Advocata Institute चे Bath Curry Indicator (BCI) देशात खाद्य वस्तुंच्यासंदर्भातील महागाईचे आकडे जारी करते. BCI नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंतची आकडेवारी जारी केली आहे. त्यामध्ये, 15 टक्क्यांनी महागाई वाढल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे भाजीपाल्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. श्रीलंकेत 100 ग्रॅम हिरवी मिरची जेथे 18 (श्रीलंकन) रुपये होती, ती आता 71 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच 1 किलो हिरव्या मिरचीसाठी 710 रुपये किंमत झाली आहे. एकाच महिन्यात वाढत्या मिरचीच्या किंमतीत 287 टक्क्यांची वाढ दिसत आहे.
तसेच, वांग्याच्या किंमतीत 51 टक्के वाढ झाली असून लाल कांद्याच्या किंमतीत 20 ते 40 टक्क्यांची वाढ आहे. तर, लाल टमाट्यांच्या किंमतीत 10 टक्के वाढ झाली आहे. एक किलो बटाटा घेण्यासाठी 200 रुपये मोजावे लागत आहेत. श्रीलंकेत आयात होत नसल्याने दूध पावडरचीही कमतरता जाणवत आहे. एकूणच 2019 नंतर किंमती दुप्पटीने वाढल्या आहेत, तर डिसेंबर 2020 च्या तुलनेत 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका कुटुंबाने डिसेंबर महिन्यात आठवड्याच्या भाजीपाल्यासाठी 1165 रुपये खर्च केले असतील, तर आता तेवढेच सामान खरेदी करण्यासाठी 1593 रुपये खर्ची करावे लागतील.