न्यूयॉर्क : १५ महिन्यांचे बाळ ११ व्या मजल्यावरील घराच्या गॅलरीतून खाली पडल्याची घटना अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील मिनियापोलीस येथे घडली असून, ११ व्या मजल्यावरून खाली पडलेले हे बाळ जखमी झाले आहे; पण त्याच्या जीवितास मात्र कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर चमत्कारी बाळ म्हणून त्याला ओळखले जात आहे. मुसा दायिब असे या बाळाचे नाव असून, गॅलरीच्या रेलिंगमधून निसटून ते खाली पडले होते; पण खालची जागा मऊ असल्याने ते वाचले आहे. त्याच्या दोन्ही हातांची हाडे फ्रॅक्चर असून, पाठीचा कणा व कंबरेचे हाडही मोडले आहे. सध्या ते व्हेंटिलेटरवर श्वास घेत आहे; पण ते पडले तिथे मऊ हिरवळ असल्याने त्याचा जीव वाचण्याची शक्यता आहे. आपण एवढ्या उंचीवरून पडलो, तर नक्की मरणार, असे या बाळावर उपचार करणार्या हेनपिन मेडिकल सेंटरमधील टिना स्लशर यांनी म्हटले आहे. ही सर्व घटना अगदी मिनिटभरात झाली, असे सामाजिक कार्यकर्ते बिही यांनी सांगितले. खाली पडलेले बाळ वाचले हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. दायिबला झालेल्या जखमा मोठ्या आहेत, त्याचा त्याच्या पुढच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे आज सांगता येणार नाही; पण काही आठवड्यांत वा महिन्यात ते रुग्णालयाबाहेर पडेल, असे स्लशर म्हणाल्या. हा दैवी चमत्कारच आहे, असे सर्वांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)
११ व्या मजल्यावरून पडलेले बाळ जिवंत
By admin | Published: May 16, 2014 5:08 AM