पाकिस्तानचा ( Pakistan) पंतप्रधान हा लष्कराची कठपुतळी असतो. पंतप्रधान विरोधात गेला की त्याची खूर्ची काढून घेऊन तिथे लष्करी राजवट स्थापन होते. जनरल परवेझ मुशर्रफ हे देखील तसेच लष्करशहा बनले होते. आता पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि लष्करामध्ये खटके उडू लागले आहेत. यामुळे इम्रान खान यांची खूर्ची धोक्यात आली आहे.
लष्करी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून इम्रान खान आणि लष्करप्रमुख बाजवा (Qamar Javed Bajwa) यांच्यात खटके उडत आहेत. आयएसआय प्रमुखांच्या बदलीवरून हा वाद सुरु झाला आहे. बाजवा यांनी सोमवारी इम्रान खान यांना न कळवताच आयएसआयच्या मुख्यालयाला भेट दिल्याने खळबळ उडाली आहे. बाजवा आणि आयएसआय प्रमुख फैज हामिद यांच्यात गुप्त बैठक झाली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि अंतर्गत सुरक्षा यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. परंतू अद्याप संपूर्ण गोष्ट बाहेर आलेली नाही. या गुप्त बैठकीमुळे बाजवा कोणतीतरी मोठी चाल खेळत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे इम्रान खान यांची खूर्ची धोक्यात येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनुसार जर लष्कर आणि आयएसआय एकत्र आले तर सरकारसाठी ही धोक्याची वेळ ठरू शकते.
फैज हामिद यांना बढती देण्यात आली आहे, त्यांच्या जागी येणाऱ्या नव्या आयएसआय प्रमुखावरून इम्रान खान आणि बाजवा यांच्यात वाद सुरु आहे. हामिद यांना पेशावर कोअरचा कमांडर करण्यात आले आहे. तर त्यांची जागा लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम घेणार आहेत. मात्र, पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने अंजुम यांच्या नियुक्तीची अधिसूचनाच काढलेली नव्हती. यामुळे सरकार आणि लष्करामध्ये तणाव निर्माण झाला आहे.