ऑनलाइन लोकमतलंडन, दि. 10 - भारतीय वंशाच्या लंडनमध्ये वास्तव्याला असणा-या 10 वर्षांच्या ध्रुव तलाटी या मुलानं IQ टेस्टमध्ये सर्वाधिक म्हणजे 162 गुण मिळवले आहेत. त्याच्या देदीप्यमान यशामुळे जगभरात त्याचं नाव प्रसिद्धीच्या झोतात आलं आहे. जगातील सर्वात मोठी आणि जुनी IQ टेस्ट सोसायटीनं घेतलेल्या मेन्सा कॅटल थर्ड बी टेस्टमध्ये ध्रुवनं हे गुण प्राप्त केले आहेत. या IQ टेस्टचं वैशिष्ट्य म्हणजे ध्रुवनं बुद्धिमत्तेच्या जोरावर अल्बर्ट आइनस्टाइन आणि स्टिफन हॉकिंगलाही मागे सोडलं आहे. IQ टेस्टमध्ये 162 गुण मिळवल्यानं ध्रुव ता-यासारख्या जगभरात चमकला आहे. ध्रुवला जगभरातला सर्वाधिक बुद्धिमान व्यक्ती म्हणून किताब बहाल करण्यात आला आहे.
लंडनमध्ये वास्तव्याला असणा-या ध्रुव तलाटीनं मेन्सा इंटेलिजन्स टेस्टसंबंधित कॅटल थर्ड बी पेपर गेल्या महिन्यातल्या जुलैमध्ये दिला होता. त्याच परीक्षेत ध्रुवनं प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइनस्टाइन आणि हॉकिंग यांच्याहून 2 गुण जास्त मिळवले आहेत. या अलौकिक यशामुळे 10 वर्षांच्या ध्रुवला काही मोजक्या बुद्धिमान लोकांच्या यादीत स्थान मिळाले आहे.
ध्रुव लंडनमधल्या बार्किंगसाइडच्या फुलवूड या प्राथमिक शाळेत अभ्यासाचे धडे गिरवतो आहे. IQ टेस्टमध्ये ध्रुवला 150 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यातील बहुतेक प्रश्नांची उत्तर त्यानं अचूक दिली आहेत. याआधी याच टेस्टमध्ये आइनस्टाइन आणि हॉकिंगनं 160 गुण मिळवले होते. मात्र ध्रुवनं कमी वयात 162 गुण मिळवून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.