ऑनलाइन लोकमतइराक, दि. 10 - बगदाद शहर दोन आत्मघाती बॉम्बस्फोटानं पुन्हा एकदा हादरलं आहे. बगदादजवळच असलेल्या नखील या मॉलजवळ दोन कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या शक्तिशाली कार बॉम्बस्फोटात 28हून अधिक लोक जखमी आहेत.
पहिला बॉम्बस्फोट कार पार्किंग केलेल्या परिसरात झाला. तर दुसरा बॉम्बस्फोट हा नखील मॉलजवळील स्फोटकांनी भरलेल्या एका गाडीतून आलेल्या आत्मघाती हल्लेखोरानं घडवून आणला आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. गेल्या वर्षी मध्य बगदादमधल्या पॅलेस्टाइन रस्त्यावर हा मॉल सुरू करण्यात आला आहे. ईद अल-अधा जवळ आल्यानं वीकेंडच्या दिवशीही हा मॉल सुरू ठेवण्यात आला होता. या मॉलला अनेक मजले असून, प्रत्येक मजल्या दुकानं आहेत. या मॉलमध्ये शहरातला प्रसिद्ध सिनेमागृहही आहे, अशी माहिती इंटिरियर मंत्रालयानं दिली आहे. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (इसिस)नं स्वीकारली आहे. गेल्या आठवड्यातच बगदादमधल्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या हल्ल्यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अत्यंत वर्दळीच्या येथील कराडा नावाच्या व्यापारी पेठेत कारबॉम्बने हल्ला करण्यात आला. त्यात 300 जण ठार झाले होते.