बगदाद : गेल्या शनिवारी उत्तर इराकमध्ये अमेरिकेने केलेल्या ज्या लष्करी कारवाईत ‘इस्लामिक स्टेट’चा (इसिस) प्रमुख अबू बक्र अल बगदादी ठार झाला त्यात ‘इसिस’मधीलच एका फितूर नेत्याने फार महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे बगदादीसाठी अमेरिकेने जाहीर केलेले २५ दशलक्ष डॉलरचे इनामही त्यालाच दिले जाईल, असे वृत्त आहे.
अमेरिकेतील ‘सीएनएन’ वृत्तवाहिनी व ब्रिटनमधील ‘दि मेल’ वृत्तपत्राने अमेरिकी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले. मात्र ‘इसिस’च्या या फितूराचे नाव किंवा नेमका हुद्दा त्यात उघड केला गेला नाही. सूत्रांनी सांगितले की, बगदादीचा मुक्काम नेमका कुठे आहे याची माहिती गुप्तहेरांकडून मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करण्यापूर्वी अमेरिकेने बगदादीच्याच या विश्वासू सहकाऱ्यास फितूर करून घेतले व आपला हेर म्हणून कामाला लावले. बगदादी ज्या इमारतीत राहात होता तिची नेमकी रचना, तेथे जाण्या-येण्याचे मार्ग, लपून बसण्याच्या जागा, तेथे तैनात असलेले सशस्त्र पहारेकरी याची इत्यंभूत माहिती या फितूराने अमेरिकेच्या सैन्यास दिली. त्यामुळे नेमकी कारवाई करून ती फत्ते करणे शक्य झाले.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानुसार वाचणे अशक्य आहे, याची खात्री झाल्यावर भयभीत झालेला बगदादी ओरडत, किंचाळत तळघरातील एका बोगद्यात शिरला. जाताना त्याने आपल्या तीन मुलांनाही सोबत ओढून नेले. पण त्या बोगद्याला दुसºया बाजूने बाहेर पडण्यासाठी तोंड नसल्याने बगदादीने अंगावर घातलेल्या स्फोटकांनी भरलेल्या जॅकेटचा स्फोट घडवून आत्मघात करून घेतला. त्या स्फोटाने बगदादीच्या देहाच्या ठिकºया उडाल्या. खातरजमा करून घेतलीबगदादीचा ओळख पटेल अशा स्थितीतील मृतदेह हाती लागला नाही. तरी अमेरिकी सैन्याने लगेच जागीच ‘डीएनए’ चाचणी करून मेला तो बगदादीच असल्याची पुरती खातरजमा करून घेतली, असेही ट्रम्प म्हणाले होते. या ‘डीएनए’ चाचणीसाठी बगदादीने वापरलेल्या दोन जुन्या अंडरवेयर व त्याच्या रक्ताचे नमुने सोबत घेऊनच अमेरिकी सैन्य जय्यत तयारनिशी आले होते. बगदादीच्या जुन्या अंडरवेयर व रक्ताचे नमुनेही ‘इसिस’मधील याच फितुराने कारवाईच्या काही दिवस आधी मिळवून अमेरिकी हेरांकडे सुपूर्द केले होते, असेही या सूत्रांनी सांगितले.