बगदाद : इस्लामिक स्टेट इसिसचा प्रमुख अबू बक्र अल बगदादी हा अमेरिकन आघाडीच्या हवाई हल्ल्यात मारला गेला काय? याचा शोध इराककडून घेतला जात आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या विमानानी इसिस नेत्यांच्या बैठकीवर हल्ला केला असून, त्यात बगदादीसह इसिसचे अनेक नेते मारले गेल्याचे वृत्त आहे. बगदादी मारला गेला असेल, तर इसिसविरोधात लढणाऱ्या आघाडीसाठी हे फार मोठे यश आहे, तर इसिसला जबर धक्का आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इसिस संघर्षासाठी आणखी १५०० सैनिक पाठविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर हवाई हल्ल्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे अमेरिका इसिसविरोधातील युद्धात उतरेल असे संकेत आहेत. इराकी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या हल्ल्यात बगदादी मारला गेला की नाही याबद्दल खात्रीलायक माहिती मिळाली नाही. आतापर्यंतचे वृत्त अनधिकृत असून आम्ही पुढचा शोध घेत आहोत असेही त्यांनी म्हटले आहे. बगदादीचे भवितव्य कळण्यास काही दिवस लागतील असे ब्रिटिश लष्करी अधिकारी निकोलस ह्यूटन यांनी म्हटले आहे. अमेरिकेने बगदादीच्या डोक्यावर १ कोटी डॉलर्सचे बक्षीस लावले असून अल काईदाचा नेता अयमान अल जवाहिरी याच्यापेक्षाही बगदादी अधिक शक्तिशाली असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यातील मृतांत अंबर प्रांताचा इस्लामिक नेता अबू मुनहाद अल स्वैदावी व सिरियातील दीर एल झौर प्रांताचा प्रमुख अबू जाहरा अल महमदी यांचा समावेश आहे.