बीजिंग: कोरोनाचा प्रादुर्भाव पसरल्यानं चीनमधील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे. शांघायमध्ये कठोर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यादरम्यान एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये रस्त्यावर पडलेल्या कचऱ्याच्या पिशव्या दिसत आहेत. त्यामध्ये कुत्रे आणि मांजरी आहेत. बॅगमध्ये भरून रस्त्यावर फेकून देण्यात आलेल्या पिशव्यांमध्ये हालचाल जाणवत आहे.
चीनमधल्या रस्त्यांच्या कडेला कचऱ्याच्या मोठमोठ्या पिशव्या दिसत आहेत. त्यात जिवंत कुत्रे, मांजरी आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. शांघायमध्ये २ कोटी ६० लाख लॉकडाऊनमध्ये असल्याचा उल्लेख ट्विटमध्ये आहे. शहरातील अनेक जण बाल्कनीतून उडी घेऊन आत्महत्या करत असल्याचं ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या पाळीव प्राण्यांना गोळा करून त्यांना संपवलं जात आहे.
गेल्या आठवड्यात चीनमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात एक आरोग्य कर्मचारी पाळीव प्राण्याला मारहाण करत होता. पाळीव प्राण्याचा मालक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यानं हे कृत्य केलं. लॉकडाऊनमुळे शहरांमध्ये भीषण परिस्थिती आहे. भुकेनं कासावीस झालेले लोक किराणा मालाच्या दुकानात जाऊन लूटमार करत आहेत. लोकांवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जात आहे. एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यास त्याला अनिश्चित कालावधीसाठी क्वारंटिन केंद्रांमध्ये पाठवलं जात आहे.