ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - "बाहुबली 2" हा बहुप्रतिक्षित सिनेमा 28 एप्रिलला प्रदर्शित झाला. अखेर दोन वर्षांनंतर प्रेक्षकांना बाहुबलीने कटप्पाला का मारलं याचं उत्तर मिळत आहे. बाहुबली चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. बाहुबली चित्रपटामुळे निर्मात्यांना प्रचंड फायदा झाला असून छोट्या मोठ्या उद्योजकांसाठीही बाहुबली चित्रपट फायद्याचा ठरला आहे.
मात्र, "बाहुबली 2" या सिनेमाची जादू केवळ भारतातच नाही तर सात समुद्रापारही पाहायला मिळत आहे. एकट्या अमेरिकेत 100 कोटींची कमाई करणारा बाहुबली हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरला आहे. न्यूज 24ने याबाबत वृ्त्त दिलं आहे.
बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत रोज यशाचे नवे शिखर गाठणारा हा चित्रपट 1000 कोटींहून जास्त कमाई करेल असा अंदाज समीक्षकांनी लावला आहे. एस एस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या या भव्यदिव्य चित्रपटाच प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डग्गुबती, तमन्न, सत्यराज यांनी मुख्य भूमिका निभावल्या आहेत.
चित्रपट कोटींची कमाई करत असला तरी या चित्रपटासाठी कलाकारांना नेमकं किती मानधन मिळालं याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
"बाहुबली"मधील कलाकारांचं मानधन किती ? घ्या जाणून-
मिळालेल्या माहितीनुसीर बाहुबलीमध्ये महेंद्र आणि अमरेंद्रची मुख्य भूमिका निभावणा-या प्रभासला 25 कोटींचं मानधन मिळालं आहे. बाहुबली चित्रपटासाठी काम करत असताना त्याने दुसरा कोणताही प्रोजेक्ट स्विकारला नव्हता. यावरुन त्याने चित्रपटासाठी किती मेहनत घेतली आहे याचा अंदाज येतो.
बाहुबलीच्या तोडीस तोड देणारी भल्लालदेवची भूमिका राणा डग्गुबतीने साकारली आहे. चित्रपटात नकारात्मक, व्हिलनची भूमिका वाट्याला आली असली तरी प्रेक्षक पसंत करत आहेत. प्रभासप्रमाणे राणानेही या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. या चित्रपटासाठी त्याला 15 कोटींचं मानधन देण्यात आलं.
बाहुबलीमध्ये अभिनेत्रींच्या वाट्यालाही दमदार भूमिका आल्या आहेत. यामध्ये राजमाता शिवगामीची भूमिका साकारणा-या रम्या कृष्णनने आपल्या उत्कृष्ट अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली आहे. चित्रपटात मायाळू आणि तितकीच कठोर आणि शूर भूमिका त्यांनी साकारली आहे. चित्रपटासाठी त्यांना 2.5 कोटी मानधन मिळालं आहे.
बाहुबलीमधील अजून एक महत्वाचं पात्र म्हणजेच देवसेना. बाहुबलीची पत्नी देवसेनेची भूमिका साकारणा-या अनुष्का शेट्टीला पाच कोटी मानधन मिळालं आहे.
बाहुबली चित्रपटात महेंद्र बाहूबलीच्या प्रेयसी अवंतिकाची भूमिका तमन्नाने साकारली आहे. तिच्या वाट्याला फारच छोटी भूमिका आली आहे. मात्र तिला पाच कोटींचं मानधन मिळालं आहे.
कदाचित बाहुबलीपेक्षाही ज्या नावावर चित्रपटाला प्रसिद्धी मिळाली ते नाव म्हणजे कटप्पा. पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर दोन वर्ष कटप्पाच्या नावावरच चित्रपटाची चर्चा सुरु होती. "कटप्पाने बाहुबलीको क्यों मारा" हा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल होता. कटप्पाची भूमिका सत्यराज यांनी साकारली असून त्यांना यासाठी दोन कोटींचं मानधन देण्यात आलं.
आता सर्वात महत्वाची व्यक्ती ती म्हणजे एस एस राजामौली. ज्यांच्या खांद्यावर चित्रपटाची संपुर्ण जबाबदारी होती ते दिग्दर्शक राजामौली. चित्रपट कोटींची उड्डाणे घेत असून निर्मात्यांना फार मोठा फायदा होणार आहे हे नक्की. मिळालेल्या माहितीनुसार नफ्यातील एक तृतीयांश भाग एस एस राजामौली यांच्या वाट्याला य़ेणार आहे.