अथेन्स : ग्रीसच्या दृष्टीने अत्यंत वादग्रस्त असणाऱ्या बेलआऊट पॅकेजला ग्रीसच्या संसदेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे हे पॅकेज नागरिकांकडून मान्य करून घेण्यामधला पहिला अडसर दूर झाला आहे. युरोझोन मंत्र्यांची बैठक सुरू होण्यापूर्वी काही तास आधीच हा ठराव मंजूर झाला आहे; पण यामुळे ग्रीसमधील डाव्या आघाडीचे सरकार मात्र दुर्बळ झाले आहे. आंतरराष्ट्रीय दात्यांनी ग्रीसवर लादलेल्या कठोर सुधारणा पंतप्रधान अलेक्सिस सिपारस यांनी संसदेत मांडल्या, तर काटकसरीला विरोध करणारे नागरिक निदर्शने करीत होते. निदर्शकांनी पोलिसांवर फायरबॉम्ब फेकले. हा ठराव मंजूर झाला; पण पंतप्रधान सिपारस यांना डाव्या आघाडीच्या सिरझा पक्षातील बंडाला सामोरे जावे लागले. सत्ताधारी पक्षाच्या १४९ सदस्यांपैकी ३२ सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. पंतप्रधान सिपारस यांना ठराव मंजूर करून घेण्यासाठी युरोपियन समर्थक पक्षांची मदत घ्यावी लागली. अंतिम मतदानात ३०० पैकी २२९ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. या ठरावामुळे ग्रीसमधील करपद्धती, निवृत्तीवेतन व कामगार नियमात मोठे बदल होणार आहेत. बेलआऊट पॅकेजनुसार ग्रीसला मिळणाऱ्या ९४ अब्ज डॉलरची मदत मिळण्यासाठी हा ठराव संसदेत मंजूर होणे गरजेचे होते.
ग्रीक संसदेत बेलआऊट पॅकेज मंजूर
By admin | Published: July 17, 2015 4:25 AM