बलूच लिबरेशन आर्मीने गेल्या दोन दिवसांपासून पाकिस्तानात जबरदस्त धुमाकुळ घातला आहे. यामुळे पाकिस्तानी सैन्याचेही हाल बेहाल झाले आहेत. आता बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानात राहणाऱ्या चिनी नागरिकांना पाकिस्तान सोडण्याचे फरमान सोडले आहे. जर आपल्या भागात कुणी चिनी नागरिक आढळला, तर ठार केला जाईल, अशी धमकीही बीएलएने दिली आहे.
चिनी नागरिकांना निशाना बनवण्यासाठी बलूच आर्मीने एक स्पेशल युनिट तयार केली आहे. बलूच आर्मीच्या एका फिदायीन गटाने नुकताच पाकिस्तानात प्रचंड विध्वंस करत 70 हून अधिक लोक मारले आहेत. यात पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसातील 14 जवानांचा समावेश आहे.
खरे तर, चीन पाकिस्तानमध्ये सीपीईसी कॉरिडॉर तयार करत आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी चीन पाण्यासारखा पैसा खर्च करत आहे. पाकिस्तानातील आपला हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी चीनला आशा आहे, मात्र BLA ने पाकिस्तानी लष्कराविरोधात ज्या प्रकारे आघाडी उघडली आहे, त्यावरून चीनचा प्रकल्प पुन्हा एकदा अडकणार असल्याचे दिसत आहे. सीपीईसी कॉरिडॉरच्या बांधकामासाठी चीनने आपले अभियंते आणि अधिकारी मोठ्या संख्येने तैनात केले आहेत.
सीपीईसी विरोधात बीएलएचं ऑपरेशन -बलुच लिबरेशन आर्मीचा सामना करण्यासाठी पाकिस्तानी लष्कराने जून महिन्यातच ऑपरेशन 'आजम-ए-इस्तेखाम' सुरू केले होते. मात्र पाकिस्तानची ही चाल त्यांच्यावर उलटली आहे. यामुळे बीएलए अधिकच आक्रमक झाली आहे. त्यांचे पाकिस्तानी सैन्यावरील हल्लेही अधिक तीव्र झाले आहेत. या हल्ल्यांत बलूच लिबरेशन आर्मी (बीएलए), बलूच लिबरेशन फ्रंट (बीएलएफ) आणि तहरीक-ए-तालिबान (टीटीपी) एकत्रितपणे काम करत आहे.