इस्लामाबाद – बलुचिस्तानमध्ये (Balochistan) बलोच लिबरेशन आर्मीच्या सैन्यानं पाकिस्तानी सैन्यावर आक्रमक हल्ला केला आहे. ज्यात १०० हून अधिक पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बलोच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात फ्रंटियर कोरचे आयजी मेजर जनरल अयमान बिलाल सफदर यांचाही जागेवर मृत्यू झाला आहे.
सध्या पाकिस्तानी(Pakistan) सैन्य आणि बलुचिस्तान लिबरेशन आर्मी यांच्यात जबरदस्त युद्ध सुरु आहे. एकाचवेळी दोन ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यानं पाकिस्तानी सैन्याला कुठलंच पाऊल उचलण्याचीही संधीही मिळाली नाही. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैन्य मारले गेले. पाकिस्तानातील या भागात सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं नोश्की आणि पंजुगुर याठिकाणी असा हल्ला केला की पाकिस्तानी सैन्याच्या तुकड्या उद्ध्वस्त झाल्या.
एकीकडे पाकिस्तानी सैनिकांच्या मृत्यूची बातमी येताच प्रशासकीय अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचे मंत्री चौधरी फवाद हुसैन यांनी दोन्ही ठिकाणांवरील हल्ल्याची पुष्टी करत बलुचिस्तान सैन्याच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत लिबरेशन आर्मीचे जवान मारले त्याबद्दल पाकिस्तानी सैन्याचं कौतुक केले आहे. विशेष म्हणजे, नैसर्गिक साधन संपत्तीनं नटलेला बलुचिस्तानचा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे.
बलुचिस्तानमधील लोकं गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. जगातील विविध व्यासपीठावर बलुचिस्तानचे प्रतिनिधी याबाबत सातत्याने आवाज उचलत आहेत. पाकिस्तानी सैन्य बलुचिस्तानच्या जनतेवर इतका अन्याय करत आहे त्याचा हिशोब लावणंही कठीण आहे. त्यामुळे बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा करावा अशी मागणी याठिकाणचे स्थानिक नेते वारंवार करत असतात.
बलुचिस्तान सैन्यानं सप्टेंबर २०२१ मध्येही असाच हल्ला केला
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटच्या सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर मोठा हल्ला केला होता. हा हल्ला रॉकेट आणि इतर घातक शस्त्रांनी करण्यात आला. ही घटना आवारन जिल्ह्यातील पिरंजर भागात घडली. हे ठिकाण बलुचिस्तान प्रांतात आहे. या घटनेत मोठ्या संख्येने पाक सैनिक मृत्युमुखी पडले होते. बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटने पाकिस्तानचा झेंडा लावलेल्या लष्कराच्या वाहनावर हल्ला केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाल्याची अधिकृत माहिती मिळाली. पण, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यात कमीत-कमी ११ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला होता.