बीजिंग : चीनने हिंसाचारग्रस्त मुस्लिमबहुल शिनजियांग प्रांतात मुलांची ‘सद्दाम’ आणि ‘जिहाद’ यासारखी अनेक इस्लामी नावे ठेवण्यास बंदी घातली आहे. जगभरातील मुस्लिमांत प्रचलित असलेल्या अनेक नावांवर शिनजियांगच्या अधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे. धार्मिक संकेत देणाऱ्या या नावांमुळे धार्मिक भावना तीव्र होऊ शकतात. त्यामुळे या नावांवर बंदी घालण्यात आल्याचे सांगण्यात येते, असे ह्युमन राईटस् वॉच (एचआरडब्ल्यू) या मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे. सत्ताधारी चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या जातीय अल्पसंख्यकांच्या नावे ठेवण्याच्या नियमांतर्गत मुलांची इस्लाम, कुराण, मक्का, जिहाद, इमाम, सद्दाम, हज आणि मदिना यासारखी नावे ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे वृत्त रेडिओ फ्री एशियाने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिले आहे. बंदी घालण्यात आलेली नावे असलेल्या मुलांना घराची नोंदणी करता येणार नाही. सरकारी शाळा आणि इतर सामाजिक सुविधांचा लाभ घेण्यासाठी घराची नोंदणी गरजेची आहे. हा नवा निर्णय शिनजियांगमधील दहशतवादाविरुद्धच्या चीनच्या लढाईचा एक भाग आहे. शिनजियांगमध्ये उईगुर मुस्लिमांची लोकसंख्या एक कोटीहून अधिक आहे.
सद्दाम, जिहाद, हज, मदिनासह अनेक नावांवर चीनमध्ये बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2017 1:02 AM