ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 20 - भारतीय टीव्ही आणि रेडिओ चॅनेल्सवर पुर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय पेमरा म्हणजेच पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने घेतला आहे. शुक्रवारपासून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे. तसंच जो कोणी या निर्णयाचं उल्लंघन करेल त्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. सरकारकडून करण्यात आलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
'21 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजल्यापासून हा निर्णय अंमलात येणार आहे. जो कोणी रेडिओ आणि टीव्ही स्टेशन बंदीचं उल्लंघन करेल त्यांना कोणतीही नोटीस न देता परवाना रद्द करण्यात येईल', असं पत्रकच पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने काढलं आहे. भारताशी संबंधित कोणतेच कार्यक्रम, सिरिअल आणि चित्रपट यामुळे दाखवण्यात येणार नाही आहेत.
भारतीय मीडियाला देण्यात आलेले हक्कदेखील काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परवेज मुशर्रफ यांचं सरकार असताना 2006मध्ये हे हक्क देण्यात आले होते.
18 सप्टेंबरला झालेल्या उरी दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. त्यानंतर भारताने 28 सप्टेंबर रोजी सर्जिंकल स्ट्राईक केला होता. पाकिस्तानने मात्र कोणताही सर्जिकल स्ट्राईक झालेला नाही असा दावा केला होता. भारतातही पाकिस्तानी कलाकारांना आणि त्यांच्या चित्रपटांना विरोध होत असताना पाकिस्ताननेही एम एस धोनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता.