बँकॉक : विदेशी दाम्पत्यांना आता थाई महिलेचे गर्भाशय भाड्याने घेऊन अपत्य प्राप्ती करून घेता येणार नाही. गेल्या वर्षी सरोगेसीची दोन प्रकरणे चांगलीच गाजली होती. त्या पार्श्वभूमीवर थायलंड सरकारने व्यावसायिक सरोगेसीसाठी विदेशी दाम्पत्यांना थाई महिलेची मदत घेण्यास बंदी घालण्याचा कायदाच मंजूर केला आहे. या कायद्यातहत इतरांसाठी एखाद्या महिलेस सरोगेसीसाठी राजी करण्यास किंवा यासाठी मध्यस्थीसाठीही बंदी घालण्यात आली आहे. थाई महिलेचे गर्भाशय जगाचे गर्भाशय होऊ नये, या उद्देशातहत हा बंदी कायदा करण्यात आला आहे.गेल्या वर्षी एका आॅस्ट्रेलियन दाम्पत्याने थायलंडच्या एका सरोगेट महिलेच्या पोटी जन्मलेल्या गतिमंद आणि विद्रूप मुलाला स्वीकारण्यास नकार दिला होता. तेव्हापासून थायलंडच्या सरोगेसी उद्योगाबाबत वादाला तोंड फुटले होते. या आॅस्ट्रेलियन दाम्पत्याने या मुलाला येथेच सोडून देत दोन जुळ्या मुलींना मात्र सोबत नेले होते, असा आरोप या सरोगेट मातेने केला होता.जपानची एक व्यक्ती तर थायलंडच्या विविध सरोगेट महिलांच्या मदतीने डझनभर मुलांचा पिता बनली. त्यामुळे गर्भाशय भाड्याने घेऊन अपत्य सुख देणाऱ्या थायलंडच्या सरोगेसी उद्योगाविषयी चिंता वाढली होती. १९९७ मध्ये थायलंडच्या मेडिकल कौन्सिलने व्यावसायिक सरोगेसीवर बंदी घातली होती. (वृत्तसंस्था)तसेच नोव्हेंबरमध्ये संसदेत हा व्यावसायिक सरोगेसी बंदी कायदा मंजूर करण्यात आला होता.या कायद्यातहत १० वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. सरोगेसीवर सर्रास बंदी घालण्यात आलेली नाही. थाई दाम्पत्यास अपत्यप्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारे मोबदला न देता सरोगेट महिलेची मदत घेता येईल. यासाठी सरोगेट महिलेचे वय २५ वर्षापेक्षा अधिक असावे, ही तरतूद करण्यात आली आहे, असे संसद सदस्य वानलोप तंगकनानूराक यांनी सांगितले.
विदेशींसाठी थायलंडमध्ये व्यावसायिक सरोगेसी बंदी
By admin | Published: February 21, 2015 3:43 AM