काेलंबाे : आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू केल्यानंतर आता ३६ तासांसाठी साेशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. सरकारच्या विराेधात जनतेला एकत्र हाेण्यापासून राेखणे, हा यामागील उद्देश असल्याची टीका श्रीलंकेतील विराेधकांनी केली आहे.
श्रीलंका सरकारने शनिवारी आणीबाणी घाेषित केल्यानंतर ३६ तासांसाठी संचारबंदी लागू केली हाेती. आता तेथे व्हाॅट्सॲप, ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासारख्या साेशल मीडियावरही बंदी घालण्यात आली आहे. देशात वीजटंचाई, अन्नधान्य, इंधन तसेच जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यात सरकार अपयशी ठरल्याची जाेरदार टीका हाेत आहे. सरकारविराेधात जनताही रस्त्यावर उतरू लागली आहे. त्यांना एकत्र येण्यापासून राेखण्यासाठी साेशल मीडियावर बंदी टाकण्यात आल्याची टीका हाेत आहे.
सायबर सुरक्षा आणि इंटरनेटवर लक्ष्य ठेवणारी ‘नेटब्लाॅक्स’ या संघटनेने साेशल मीडिया अनेक ॲप्सवर बंदी घालण्यात आल्याचा दुजाेरा दिला. श्रीलंकेतील प्रमुख नेटवर्क ऑपरेटर्स श्रीलंका टेलीकाॅ, माेबिटेल, हच या कंपन्या बंदीच्या कक्षेत आल्या आहेत. फेसबुक, ट्वीटर, यूट्यूब, इन्स्टाग्राम, टाॅकटाॅक, स्नॅपचॅट, व्हाॅट्सॲप, टेलिग्राम, इत्यादींवर बंदीचा परिणाम झाला आहे.
बंदीचा उपयाेग नाही- नमल राजपक्षेश्रीलंकेचे राष्ट्रपती राजपक्षे यांचा पुतण्या आणि मंत्री असलेल्या नमल राजपक्षे यांनी सरकारला साेशल मीडियावरील बंदीवरून घरचा आहेर दिला आहे. या बंदीचा काही उपयाेग नसून नागरिकांकडे व्हीपीएनसारखे इतर पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
६०० आंदाेलकांना केली अटकसरकारच्या विराेधात रॅली काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६०० हून अधिक नागरिकांना पश्चिमेकडील भागातून अटक करण्यात आली. विराेधी पक्षनेते सजित प्रेमदासा यांच्या नेतृत्वात रॅली काढण्यात आली हाेती.
विराेधांची निदर्शनेआणीबाणी व संचारबंदीचे आदेश झुगारून श्रीलंकेतील प्रमुख विराेधी पक्ष समागी जन बलवेगयाच्या खासदारांनी काेलंबाेमध्ये जाेरदार निदर्शने केली. यावेळी राष्ट्रपती गाेटाबाया राजपक्षे यांनी घेतलेल्या निर्णयाचा विराेध करण्यात आला. श्रीलंकेत लाेकशाहीचे आम्ही रक्षण करू, असे विराेधी पक्षाचे खासदार हर्षा डिसिल्व्हा म्हणाले.
एअर इंडियाकडून उड्डाणांमध्ये कपातएअर इंडियाने श्रीलंकेमध्ये दर आठवड्यात जाणाऱ्या उड्डाणांची संख्या १६ वरून १३ पर्यंत आणली आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे मागणी कमी झाली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. दिल्लीहून जाणाऱ्या विमानांची संख्या कमी करण्यात येणार आहे.