वॉशिंग्टन : माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांच्या खासगी सर्व्हरमधून पाठविण्यात आलेली सात ई-मेल्सची मालिका खुली करण्यास अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर मंत्रालयाने हिलरींच्या घरातील सर्व्हरवर अत्यंत गोपनीय अशी अनेक सरकारी रहस्ये होती ही बाब पहिल्यांदाच मान्य केली. २२ दस्तावेजांचा समावेश असलेली ७ ई-मेल्सची मालिका देण्यास परराष्ट्र मंत्रालय नकार देईल. हे ई-मेल्स ३७ पानांवर असून ते जेव्हा पाठविण्यात आले होते तेव्हा त्यांना गोपनीय घोषित करण्यात आले नव्हते, असे मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.हिलरी यांच्या खासगी ई-मेल खात्यातून हे ई-मेल्स करण्यात आले तेव्हा त्यातील माहिती गोपनीय होती की नाही, याची आता परराष्ट्र मंत्रालय पडताळणी करीत आहे.या कागदपत्रांत मोठ्या प्रमाणात गुप्तचर माहिती आहे. त्यामुळे गुप्तचर संघटनांच्या विनंतीवरून या दस्तावेजांच्या गोपनीयतेचा स्तर वाढविण्यात येत आहे, असेही किर्बी म्हणाले. (वृत्तसंस्था)- हिलरी आणि राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यातील आठ ई-मेल्ससह १८ इतर ई-मेल खुले करण्यासही मनाई करण्यात आली आहे. आज खुल्या होणाऱ्या ई-मेल्सहून हे ई-मेल पूर्णपणे वेगळे आहेत. दरम्यान, हिलरी यांच्या वैयक्तिक सर्व्हरवर अत्यंत गोपनीय माहितीचे ई-मेल आढळून आल्यामुळे त्या राष्ट्राध्यक्षपदासाठी विश्वसनीय व्यक्ती नसल्याचे सिद्ध झाले आहे, असे रिपब्लिकन नॅशनल कमिटीचे अध्यक्ष रिन्स प्रीबस यांनी सांगितले.
‘ते’ ई-मेल्स खुले करण्यास बंदी
By admin | Published: January 31, 2016 12:33 AM