भारत सरकार आणि कॅनडा सरकारमधील संबंध तणावपूर्ण झाले असतानाच कॅनडामधीलराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हालचालींवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. कॅनडामधील हाऊस ऑफ कॉर्मर्सचे सदस्य आणि न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते जगमीत सिंग यांनी कॅनडामधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेटवर्कवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
जगमीत सिंग यांनी सांगितले की, आरसीएमपी आयुक्तांकडून देण्यात आलेल्या माहितीबाबत न्यू डेमोक्रॅटिक पक्ष चिंतीत आहे. भारतीय अधिकाऱ्यांकडून कॅनेडियन, विशेषकरून कॅनडामधील शीख समुदाय, भीती, धमकी, शोषण आणि हिंसेची शिकार होत आहेत. शिखांकडून जबरदस्तीने वसुली केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
जगमीत सिंग यांनी यांनी यावेळी दहशतवादी निज्जर याचाही उल्लेख केला. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येबाबतचे भारताच्या विरोधातील सबळ पुरावे कॅनडाकडे असल्याचा दावाही केला आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये आरसीएमपीने १२ लोकांच्या जीवाला धोका असल्याचा इशारा दिला होता, असेही त्यांनी सांगितले.
सिंग यांनी केलेल्या दाव्यानुसार धोक्याचा इशारा असतानाही कॅनेडियन नागरिकांच्या सुरक्षेची निश्चिती करण्यात आली नाही. आमचं प्राधान्य कॅनेडियन नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्यास आहे जेणेकरून ते वसुली, हिंसा आणि निवडणुकीतील हस्तक्षेप यापासून मुक्त राहतील. कॅनडा आणि आमच्या नागरिकांच्या सुरक्षेच्या हिताच्या दृष्टीने मी सर्व नेत्यांना आग्रह करतो की, त्यांनी आपली सुरक्षा सुनिश्चित करावी, तसेच भारत सरकारचं उत्तरदायित्व निश्चित करावं, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, जगमीत सिंह यांनी कॅनडा सरकारने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कॅनडामधून केलेल्या हकालपट्टीचं स्वागत केलं आहे. तसेच कॅनडा सरकारने भारतावर राजकीय निर्बंध लागू करावेत, असं आवाहनही जगमीत सिंग यांनी केलं आहे.