Bangladesh Protests : बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी काल(दि.६) आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि देशातून पलायन केले. त्यामुळं आता बांग्लादेशात अंतरिम सरकार स्थापन झालं आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरही सध्या हिंसाचारानं बांगलादेश धुमसत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या बांगलादेशातील घडामोडींकडे संपूर्ण भारताचं लक्ष लागलं आहे.
बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळं हिंसाचार शिगेला पोहोचला आहे. शेख हसीना यांनी सोमवारी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ता लष्कराच्या हाती गेली. मात्र, आंदोलकांनी देशाची सत्ता लष्कराकडे देण्यास विरोध दर्शवला आहे. दरम्यान, हिंसक जमावानं कारागृह देखील सोडलं नाही. कारागृहात घुसूनही जमावानं जाळपोळ केली. यावेळी अनेक कैदी पळून गेले. या कैद्यांमध्ये अनेक दहशतवाद्यांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय लष्करही अलर्ट मोडवर आहे.
बांगलादेशच्या माध्यमांमधून समोर आलेल्या बातम्यांनुसार, देशात सत्तापालट झाल्यानंतर परिस्थिती आणि व्यवस्था कोलमडली आहे. दरम्यान, देशातील तुरुंगही रिकामी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेशात रविवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून कर्फ्यू लागू करण्यात आला होता. मात्र, सोमवारी हिंसक आंदोलकांनी कर्फ्यु झुगारुन शेख हसीना यांच्या घराला घेराव घातला. एवढंच नाही तर, कर्फ्यू दरम्यानच शेरपूर कारागृहात हल्लेखोर लाठ्या घेऊन घुसले आणि जवळपास ५०० कैद्यांना कारागृहातून बाहेर काढलं.
आंदोलकांकडून जाळपोळ आंदोलकांनी शेरपूरच्या कारागृहातच नव्हे तर दमदमा कालीगंज परिसरातही घुसून आग लावली. शेरपूरचे उपायुक्त अब्दुल्ला अल खैरुन यांनी सांगितलं की, सायंकाळी पाचच्या सुमारास हल्लेखोरांनी कारागृहावर हल्ला केला. सोमवारी संतप्त जमावानं फक्त कारागृहातच नव्हे तर पोलीस ठाण्यांनाही लक्ष्य केलं. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याला हल्लेखोरांनी आग लावली. याशिवाय, जिल्हा परिषद, जिल्हा निवडणूक कार्यालय, सोनाली बँक तसेच अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली.
शेख हसीना भारतात शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर देश सोडून पलायन केलं. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतल्याची माहिती मिळत आहे. भारतात काही दिवस आश्रय घेतल्यानंतर शेख हसीना इंग्लंडला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. बांगलादेशात सुरू असलेला गोंधळ हा केवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुरता मर्यादित नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे. तसंच, या आंदोलनादरम्यान देशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचीही सुटका करण्यात आली आहे. त्यांच्या पक्षाशी संबंधित लोक बांगलादेशात गोंधळ घालत असल्याचं म्हटलं जात आहे.