काठमांडू: नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी बांगलादेशी हवाई कंपनीच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये विमानातील 67 पैकी 40 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. ढाका विमानतळावरून उड्डाण केलेल्या या विमानाने काठमांडू विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताच पेट घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत अनेक प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. याशिवाय, धावपट्टीच्या परिसरात अनेक प्रवाशांचे मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत पडल्याचेही समजते.
अमेरिका-बांगलादेश सेवा देणाऱ्या या विमानात 67 प्रवासी होते. आतापर्यंत यापैकी 40 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. विमानतळावरील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सध्या दुर्घटनाग्रस्त विमानातील जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. तत्पूर्वी विमानाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
एका प्रत्यक्षदर्शी महिलेल्या माहितीनुसार हे विमान खूपच कमी उंचीवर उडत होते. त्याचवेळी हे विमान डोंगरावर आदळेल की काय असे वाटत होते. त्यानंतर हे विमान धावपट्टीपर्यंत पोहोचले का, हे मला माहिती नव्हते. मात्र, काही वेळानंतर मला एकापाठोपाठ स्फोटाचे आवाज ऐकू आले, असे या महिलेने सांगितले.