ढाका - जगभरात बलात्कार, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. सामूहिक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. बांगलादेशमध्ये अशाच घटना समोर येत आहे. यामुळे सोशल मीडियावर लोक आक्रमक झाले आहे. जनआक्रोश पाहायला मिळत आहे. याच दरम्यान बांगलादेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने मंत्रिमंडळात बलात्कार प्रकरणात अधिकतम जन्मठेपेची शिक्षा वाढवून मृत्यूदंड करण्यासाठी मंजुरी दिली आहे. सोमवारी ही मंजुरी देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाचे प्रवक्ता खांडकर अनवारुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती अब्दुल हामिद महिला व बाल अत्याचार अधिनिमयाच्या संशोधनासंबंधित अध्यादेश जारी करू शकतात. कारण सध्या संसदेचं सत्र सुरू नाही. सध्याच्या कायद्यानुसार तेथे बलात्कार प्रकरणात अधिकतम शिक्षा जन्मठेप आहे. पीडितेचा मृत्यू होतो तेव्हा मृत्यूदंडाची परवानगी दिली जाते.
जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत बलात्काराच्या 889 घटना, 41 पीडितेचा मृत्यू
कायदे मंत्री अनीसुल हक यांनी राष्ट्रपती मंगळवारी अध्यादेश जारी करू शकतात असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांनंतर ढाका आणि अन्य ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. महिलांच्या अधिकारांसाठी संघर्ष करणाऱ्या संघटनाही समोर आल्या होत्या. यापैकी आइन-ओ-सालिश केंद्रानुसार जानेवारीपासून ऑगस्टपर्यंत बलात्काराच्या 889 घटना घडल्या आहेत. यापैकी 41 पीडितेचा मृत्यू झाला आहे.
फेसबुकवर धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर असा एक धक्कादायक व्हिडीओ हा व्हायरल झाला होता. यामध्ये दक्षिण-पूर्व जिल्ह्यात काही लोक एका महिलेला निर्वस्त्र करीत तिच्यावर हल्ला करत होते. देशाच्या मानवी हक्क आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या महिलेवर एका वर्षात वारंवार बलात्कार करण्यात आला. दुसऱ्या एका प्रकरणात महिलेला कारने खेचत कॉलेजच्या डॉर्मेट्रीमध्ये आणण्यात आलं व तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हाथरस पुन्हा हादरले! 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू
हाथरसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र याच दरम्यान आता हाथरस पुन्हा एकदा हादरले आहे. अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची भयंकर घटना समोर आली. उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला आहे. अलीगड जिल्ह्यातील इगलास गावात ही धक्कादायक घटना घडली. चिमुकलीवर 15 दिवसांपूर्वी बलात्कार करण्यात आला होता. प्रकृती गंभीर असल्याने मुलीवर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारानंतर मुलीचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा परिसरात संतापाची लाट उसळली. मुलीचा मृतदेह दिल्लीहून राहत्या घरी आणत असताना पीडितेच्या कुटुंबियांनी रस्ता रोखला. तसेच आरोपीला शिक्षा मिळाल्यानंतरच मुलीवर अंत्यसंस्कार केले जातील असं पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी म्हटलं होतं.