Sheikh Hasina vs Bangladesh Court: बांगलादेशातील सत्तापालटानंतर तेथील न्यायालयाने पहिल्यांदाच शेख हसीना यांच्याविरुद्ध निकाल दिला आहे. अणुऊर्जा प्रकल्प उभारणीशी संबंधित एका प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपांवर न्यायालयाने आपला निकाल दिला आहे. या प्रकरणात शेख हसीना यांच्यावर बेकायदेशीर मार्गाने पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोप होता. ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या एका न्यायालयाने शेख हसीना, त्यांची बहीण आणि मुलाच्या प्रवासावर बंदी घातली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी होईल असे न्यायालयाने म्हटले आहे.
शेख हसीना यांच्यावर आरोप काय?
बांगलादेशातील रूपपूर येथे एक अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. शेख हसीना यांनी त्यांच्या सरकारच्या वेळी यासाठी ५९,००० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. बांगलादेशातील विद्यार्थ्यांच्या उठावानंतर, युनूस सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. ५ सदस्यीय तपास पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे की शेख हसीना यांच्याविरुद्ध प्राथमिक पुरावे सापडले आहेत. सुनावणीनंतर, ढाका महानगराचे वरिष्ठ विशेष न्यायाधीश मोहम्मद झाकीर हुसेन गालिब यांनी ही बंदी जाहीर केली आहे.
आरोपींमध्ये कोण-कोण? आणखी काय आरोप?
या आदेशानुसार, शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद जॉय, कन्या सायमा वाजेद पुतुल, शेख रेहाना यांच्या दोन्ही मुली ट्यूलिप सिद्दीक आणि अझमिना सिद्दीक आणि त्यांचा मुलगा रदवान मुजीबूर सिद्दीक यांना प्रवासास बंदी करण्यात आली आहे. बांगलादेशचे अंतरिम सरकारही शेख हसीना यांच्यावर नरसंहाराचा खटला चालवणार आहे. अलिकडेच, कार्यवाहक सल्लागार मोहम्मद युनूस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शेख हसीना यांच्या कार्यकाळात लोक मारले गेले आहेत. त्यासाठी त्यांच्यावर हा खटला चालवला जाईल. युनूस यांनी सांगितले आहे की, हसिना शेख या बांगलादेशात असोत वा नसोत, आम्ही त्यांच्याविरुद्ध नक्कीच खटला दाखल करू. युनूस म्हणतात की जर त्यांना नरसंहाराच्या प्रकरणातून सोडण्यात आले, तर तो बांगलादेशातील लोकांवर अन्याय ठरेल.