ढाका - बांगलादेशच्या विरोधीपक्ष नेत्या आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांनी भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सत्तेत असताना अनाथाश्रमासाठी राखीव निधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. 2 लाख 52 हजार डॉलरचा निधी अनाथाश्रमासाठी राखीव ठेवण्यात आला होता. हा निधी चोरल्याप्रकरणी त्या दोषी आढळल्या आहेत. ढाका न्यायालयाने याप्रकरणी 72 वर्षीय खालिदा झिया पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
याच प्रकरणात खालिदा झिया यांचा मुलगा तारीक रहमान आणि इतर चार जणांना आधीच 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. खालिदा झिया यांनी 30 नोव्हेंबर 2014 ला आपल्यावरील आरोपांना आव्हान देणारी याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली होती आणि त्यांना कनिष्ठ न्यायालयात पाठवलं होतं. याआधी उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला होता. कनिष्ठ न्यायालयाने 19 मार्च 2014 रोजी खालिदा झिया यांना भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणात दोषी ठरवलं होतं.
झियांची सामाजिक आणि शारीरिक स्थिती पाहून न्यायालयाने पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावला. खालिदा झिया यांना न्यायालयात नेण्यापुर्वी समर्थकांनी गोंधळ घातला होता. पोलिसांवर अखेर अश्रूधुराचा वापर करण्याची वेळ आली होती.