बांगलादेशमध्ये निवडणुका होत आहेत. आज सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी सकाळी आठ वाजता मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केलं. याच दरम्यान त्यांनी भारताचं देखील भरभरून कौतुक केलं आहे.
मतदानानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताला दिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, "भारत आमचा विश्वासू मित्र आहे. त्यांनी आम्हाला साथ दिली. 1975 नंतर आम्ही आमचं संपूर्ण कुटुंब गमावलं, तेव्हा त्यांनी आम्हाला आश्रय दिला. त्यामुळे भारतातील लोकांना आमच्या शुभेच्छा आहेत."
"शक्य तेवढे मतदान करा"
बांगलादेशात एकूण 11 कोटी 93 लाख 33 हजार 157 लोक मतदार आहेत. निवडणुकीत सहभागी झालेल्या उमेदवारांची एकूण संख्या 1 हजार 969 आहे. मुख्य निवडणूक आयुक्त काझी हबीबुल अवल यांनी निवडणुकीबाबत सांगितलं की, "शक्य तेवढे मतदान करा. जर लोकांमध्ये मतदानाबाबत अविश्वास असेल, तर तो अविश्वास हळूहळू संपेल, मला आशा आहे आणि तुम्हाला यश मिळेल."
मतदानाची टक्केवारी किती असेल, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "मी याचा विचार करत नाही. माझे काम निवडणुकांचे आयोजन करणे आहे. कोण मतदानासाठी येतो आणि कोण नाही, हिंसा हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे."
विरोधक करताहेत विरोध
बांगलादेशातील निवडणुकीवर बीएनपीसह विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. काल देशभरात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. मतदानाच्या दिवशी बीएनपीने देशभरात संप पुकारला आहे.