Sheikh Hasina : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला आहे. शेख हसीना यांनी लष्करी हेलिकॉप्टरमधून देश सोडून भारतात आश्रय घेतला. आरक्षणावरून गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या आंदोलनाने रौद्र रुप धारण केल्यानंतर अशी वेळ आली की हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. आंदोलक पंतप्रधान कार्यालयात घुसले होते. त्यामुळे हसीना यांनी बांगलादेशमधून राजीनामा देत पळ काढला. बांगलादेश सोडल्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पहिल्यांदाच मौन सोडले आहे. ज्यांनी १९७१ च्या शहीदांचा आणि माझ्या वडिलांचा अपमान केला आहे त्या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे, असं शेख हसीना यांनी म्हटलं आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीन यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आपल्या प्रतिक्रियेत शेख हसीना यांनी १५ ऑगस्ट १९७५ च्या दुःखद घटनांची आठवण करुन दिली. १९७५ साली राष्ट्रपती आणि त्यांचे वडील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांची कुटुंबातील अनेक सदस्य आणि त्यांचे भाऊ आणि काका यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. शेख हसीना यांनी बंगबंधूंबद्दल मनापासून आदर व्यक्त केला आणि पीडितांना श्रद्धांजली वाहिली.
हसीना यांचा मुलगा सजीब यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून ही माहिती दिली आहे. मी तुम्हा सर्वांना १५ ऑगस्ट हा राष्ट्रीय शोक दिवस म्हणून गांभीर्याने आणि सन्मानाने साजरा करण्याचे आवाहन करतो. बंगबंधू भवन येथे पुष्पहार अर्पण करून सर्व आत्म्यांच्या उद्धारासाठी प्रार्थना करा, असे हसीना यांनी सांगितल्याचे त्यांच्या मुलाने म्हटलं आहे.
"माझी सहानुभूती माझ्यासारख्यांच्या सोबत आहेत जे आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याच्या दु:खाशी झगडत आहेत. या हत्या आणि रानटीपणात सहभागी असलेल्यांचा योग्य तपास करून दोषींना शोधून त्यांना शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे," असेही शेख हसीना यांनी म्हटलं आहे.
शहीदांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेले आणि संग्रहालय म्हणून वापरले जाणारे बंगबंधू भवन बांगलादेशातील आंदोलदरम्यान पाडण्यात आले आहे. शेख हसिना यांनी याला स्वातंत्र्याचे स्मारक म्हटले आणि हे स्मारक भूतकाळात झालेल्या अत्याचारांची आठवण करून देणारे असल्याचे सांगितले. हसीना यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचे स्मरण ठेवण्यावर भर देत राष्ट्रीय शोक दिन सन्मानाने पाळण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. स्मारकावर पुष्पहार अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्याचे आवाहन त्यांनी केले.