बांग्लादेशमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका कंटेनर डेपोमध्ये भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आग्नेय बांग्लादेशातील एका खासगी कंटेनर डेपोमध्ये झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत 40 लोकांचा मृत्यू झाला. या आगीत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री चटगावच्या सीताकुंडा उपजिल्हामधील कदमरासूल भागात आगीची भयंकर घटना घडली. येथील बीएम कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत 40 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
द डेली स्टारच्या वृत्तानुसार, कंटेनर डेपोमध्ये आग लागल्यानंतर अनेक स्फोट झाले, ज्यात किमान 40 जणांना आपला जीव गमवावा लागला. तसेच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांसह शेकडो लोकांना त्याचा फटका बसला आहे. ढाका ट्रिब्यूनने रेड क्रेसेंट यूथ चटगाावचे आरोग्य आणि सेवा विभागाचे प्रमुख इस्ताकुल इस्लाम यांच्या हवाल्याने सांगितले की, या घटनेत 450 हून अधिक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी किमान 350 लोक CMCH मध्ये आहेत.
बांग्लादेश अग्निशमन सेवेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनर डेपोला लागलेल्या आगीच्या घटनेत त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृतांचा आकडा वाढू शकतो. अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.