बांगलादेशात (Bangladesh) धार्मिक हिंसाचाराच्या घटना सातत्याने वाढतच चालल्या आहेत. हिंदूंचा (Hindu) मुख्य सन असलेल्या दुर्गा पूजेपासून, (13 ऑक्टोबर) सुरू झालेला हा हिंसाचार थांबण्याचे नाव नाही. बांगलादेशातील कोमिल्ला येथील दुर्गापूजेच्या पेंडालवर झालेल्या हल्ल्यानंतर, रविवारी रंगपूरच्या पीरगंजमध्ये हिंदूंची घरे जाळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. (Bangladesh Violence)
बांगलादेशमधील मीडिया हाऊस ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, ही घटना पीरगंजमधील रामनाथपूर युनियनमधील माझीपाराच्या जेलपोली येथे घडली. वृत्तानुसार, काही कट्टर धर्मांधांनी हिंदूंची 20 घरे जाळली आहेत. मात्र, स्थानिक संघ परिषदेच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, या धर्मांधांनी तब्बल 65 घरांना आग लावली आहे.
सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा भडकला हिंसाचार -पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरणही सोशल मीडिया पोस्टशी संबंधित आहे आणि एका हिंदू युवकाच्या फेसबूकवरील आक्षेपार्ह पोस्टनंतर हा तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संबंधित युवकाला सुरक्षा देत त्याचे घर तर वाचवले. पण धर्मांध हल्लेखोरांनी त्याच लोकेशनच्या जवळपासची घरे जाळली आहेत. याप्रकरणी ढाका ट्रिब्यूनचे अध्यक्ष मोहम्मद सादकुल इस्लाम यांच्यानुसार, हल्लेखोर जमात-ए-इस्लामी आणि विद्यार्थी संघटना इस्लामिक विद्यार्थी शिबिराच्या स्थानिक युनिटशी संबंधित होते.
यासंदर्भात, सोशल मीडियावरही काही व्हिडिओ समोर आले आहेत. हे व्हिडिओ पीरगंजचे असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये गावातील घरे जळताना आणि पोलीस हल्लेखोरांचा सामना करताना दिसत आहेत. मात्र, ढाका ट्रिब्यूनने या व्हिडिओंच्या सत्यतेची पुष्टी केलेली नाही.
हेही वाचा -- "बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होतायत; टीएमसी गप्प, फक्त भाजपलाच चिंता"
- बांगलादेशात हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिरांमध्ये तोडफोड