Bangladesh MP Anwarul Azim found dead in Kolkata: बांगलादेशचेखासदार अन्वारुल अझीम उपचारासाठी भारतात आल्यानंतर बेपत्ता झाले होते. गेल्या पाच दिवसांपासून ते बेपत्ता होते. यानंतर बांगलादेश गुप्तचर विभागाने तपास सुरू केला होता. या प्रकरणी भारताशीही संपर्क साधण्यात आला. अखेर बुधवारी तपासादरम्यान सकाळी कोलकातातील न्यू टाऊन फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. अझीम हे बांगलादेश अवामी लीगचे तीन वेळा खासदार होते. त्यांचा मृत्यू कसा झाला, यामागे कोणाचा हात आहे, याचा आता तपास सुरू आहे.
12 मे पासून अझीम कोलकातामध्ये होते
अझीम 12 मे रोजी कोलकातामध्ये आले होते. ते एका फ्लॅटवर गेले. त्यांच्यासोबत आणखी तीन जण होते. यानंतर 14 मे पासून त्यांचा मोबाईल बंद होता. त्यानंतर कुटुंबीयांना काळजी वाटू लागली. या प्रकरणाची तक्रार खासदाराच्या मुलीने बांगलादेश पोलिसांकडे केली. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. खासदाराची मुलगी सध्या कोलकातामध्ये आहे.
अझीम यांच्या मॅनेजरला खंडणीचा फोन आला
कोलकाता येथील खासदार गोपाल विश्वास यांनी 18 मे रोजी पोलिस स्टेशनमध्ये अझीम बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यानंतर कोलकाता पोलीस सक्रिय झाले. अझीम बांगलादेशच्या ट्रान्सपोर्ट युनियनशी संबंधित होते. त्यांचा स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. अजीम यांच्या मॅनेजरला खंडणीचा फोन आला होता आणि मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्याने खंडणी मागितली होती. बिधाननगर येथे मित्राच्या घरी आलेले अझीम हे सोन्याच्या आयात-निर्यातीचा व्यवसायही करत होते. त्यामुळे या हत्येत आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळीचा हात असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
ही हत्या म्हणजे सुनियोजित कट असल्याचा आरोप
सुत्रांच्या माहितीनुसार, अझीम हे स्वतः सोन्याच्या तस्करीत गुंतले होते. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी ढाका येथे सांगितले की, कोलकाता येथे खासदाराची हत्या करण्यात आली. याप्रकरणी बांगलादेश पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आतापर्यंत पकडण्यात आलेले सर्व मारेकरी बांगलादेशी आहेत. ही नियोजित हत्या होती. हत्येमागचे कारण लवकरच स्पष्ट होईल. या प्रकरणात भारतीय पोलीस सहकार्य करत आहेत.
12 मे रोजी भारतात दाखल झालेले बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम 13 मे रोजी दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी कोलकाताजवळील बिधाननगर येथील घरी मित्रांसोबत गेले होते तेव्हा त्यांना अखेरचे पाहिले गेले होते. कोलकाताच्या बिधाननगरमध्ये राहणाऱ्या एका कौटुंबिक मित्राच्या म्हणण्यानुसार, अझीम यांनी दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले होते, परंतु 13 मे पासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही, असे सांगण्यात आले.
हत्येचे कारण काय?
बांगलादेश पोलिसांनी सुरुवातीला एका महिलेसह चार जणांची आरोपी म्हणून ओळख पटवली. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. हल्लेखोर बांगलादेशी आहेत. खासदाराची हत्या करून मारेकरी बांगलादेशात पळून गेल्याची पुष्टी दोन्ही देशांच्या गुप्तचरांनी दिली आहे. मृत खासदारावर 21 जुने गुन्हे दाखल आहेत. हल्लेखोर पोलिसांच्या ओळखीचे आहेत. या हल्लेखोरांशी अझीम यांचा जुना सौदा होता. याच कारणावरून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.