ढाका - बांगलादेशने त्यांच्याकडे आश्रय घेतलेल्या रोहिंग्यांची नसबंदी करण्याची योजना आखली आहे. रोहिंग्यांच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी सर्व प्रयत्न केल्यानंतरही अपयश हाती आल्याने, अखेर नसबंदी करण्याची योजना आखण्यात आली आहे. गेल्या महिन्यात रोहिंग्यांच्या कॅम्पमध्ये कंडोम वाटण्यात आले होते, मात्र त्याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. म्यानमारमध्ये झालेल्या हिंसेनंतर जवळपास सहा लाखहून जास्त रोहिंग्यांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे.
म्यानमारहून शरणार्थी आलेल्या रोहिंग्यांनी अन्न आणि स्वच्छ पाण्यासारख्या सुविधांसाठी झगडावं लागत आहे. अशा परिस्थितीत रोहिंग्यांच्या संख्येवर नियंत्रण आणलं नाही, तर परिस्थिती अजून बिघडू शकते याची भीती अधिका-यांना वाटत आहे. कुटुंब नियोजन योजनेचे प्रमुख पिंटू कांती भट्टाचार्जी यांनी सांगितलं आहे की, रोहिंग्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणासंबंधी अज्ञान आहे, त्यांच्यात जनजागृती करण्याची गरज आहे.
एएफपीशी केलेल्या बातचीतमध्ये त्यांनी सांगितलं की, 'संपुर्ण समाजाला जाणुनबुजून अशिक्षत आणि मागासलेलं ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे. अशा परिस्थितीत लोकसंख्या नियंत्रणासंबंधी जागरुकताही कमी आहे'. पिंटू कांती भट्टाचार्जी यांनी माहिती दिली की, 'रोहिंग्या कॅम्पमध्ये मोठी कुटुंबं असणं काही वेगळी गोष्ट नाही. काहीजणांना 19 हून जास्त मुलं आहेत, तर अनेक रोहिंग्यांना एकाहून जास्त पत्नी आहेत'.
जिल्हा कुटुंब योजनेच्या अधिका-यांनी कंडोम वाटण्यासाठी एक मोहिम सुरु केली होती. मात्र आतापर्यंत फक्त 550 कंडोम पॅकेट वाटण्यात आले आहेत. पण अनेक लोक कंडोमचा वापर करण्यास इच्छुक नाहीत. यामुळेच आम्ही सरकारकडे रोहिंग्या पुरुष आणि महिलांची नसबंदी मोहिम चालवण्याची परवानगी मागितली आहे. पण यासाठीही संघर्ष करावा लागू शकतो असं पिंटू कांती भट्टाचार्जी बोलले आहेत.
अनेक शरणार्थींनी सांगितलं आहे की, मोठं कुटुंब असल्याने कॅम्पमध्ये राहण्यासाठी त्यांना मदत मिळते. जिथे पाणी आणि अन्नासाठी संघर्ष चालू आहे, तिथे मुलांच्या मदतीने काम सोपं होऊन जातं. अनेक रोहिंग्या महिला जन्मदर कमी करणं पाप असल्याचं मानतात अशी माहिती कुटुंब योजनेतील स्वयंसेवक फरहाना सुल्ताना यांनी दिली आहे. फरहाना सुल्ताना यांनी सांगितलं की, 'हे लोक म्यानमारमध्येही कुटुंब योजनेसाठी डॉक्टरकडे जात नसत. आपल्याला आणि मुलांना नुकसान पोहोचवणारी औषधं दिली जातील अशी भीती त्यांना वाटत असे'.