ढाका: नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांची राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे, अशी माहिती राष्ट्रपतींच्या प्रेस सचिवांनी मंगळवारी रात्री दिली. या बैठकीला तिन्ही सैन्य दलांचे प्रमुखही उपस्थित होते. विविध राजकीय पक्षांशी सल्लामसलत केल्यानंतर अंतरिम सरकारमधील इतर सदस्यांना अंतिम रूप दिले जाईल, असेही सांगण्यात आले. युनूस हे सध्या देशाबाहेर आहेत. युनूस यांना २००६ मध्ये ग्रामीण बँकेच्या माध्यमातून दारिद्र्यविरोधी मोहिमेसाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता.
शेख हसीना बांगलादेश सोडून गेल्यानंतरच्या हिंसक घटनांत आणखी १०९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ४४० झाली आहे. बांगलादेशाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी देशाची संसद मंगळवारी विसर्जित केली. त्यामुळे नवीन सार्वत्रिक निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि देशाची धुरा सांभाळण्यास संमती दिली. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष व माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांची नजरकैदेतून मुक्तता करण्यात आल्याची घोषणाही राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी केली. खालिदा झिया या शेख हसीना यांच्या कट्टर राजकीय विरोधक आहेत.
हसीनांचा भारतात मुक्काम वाढणार, अज्ञात स्थळी रवाना -शेख हसीना यांचा भारतातील मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे. काही कारणांमुळे त्या लंडनला रखाना होण्यास वेळ लागत असल्याचे सूत्रांनी मंगळवारी सांगितले, ब्रिटनने शेख हसीना यांना आश्रय देण्यास अद्याप संमती दिलेली नाही. त्यामुळे त्यांची रवानगी गाझियाबादेतील हिंडन येथून दुसरीकडे अज्ञात स्थळी करण्यात आली आहे. शेख हसीना यांच्यासोबत बांगलादेशातून त्यांची बहीण शेख रेहाना यादेखील आल्या आहेत. शेख रेहाना यांची कन्या ट्युलिप सिद्दीकी ब्रिटन संसदेच्या सदस्य आहेत.
फिनलंडचाही पर्याय? : मुलगीट्यूलिप वांच्याकडे लंडनला जाणे शक्य झाले नाही तर शेख हसीना फिनलंडमध्येही जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अटकेतील निदर्शकांची मुक्तता : राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी म्हटले आहे की, बांगलादेशमध्ये जुलै ते ऑगस्टपर्यंत अटक झालेल्या निदर्शकांची मुक्तता करण्यात येत आहे. बहुतांश लोकांची सुटकाही झाली आहे. संसद बरखास्त झाल्यामुळे तिथे आता नव्याने सार्वत्रिक निवडणुका होणार हे स्पष्ट झाले आहे. शहाबुद्दीन यांनी पक्षांना शांतता राखण्याचे आवाहन केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराला कडक पावले उचलण्यास त्यांनी सांगितले.
बांगलादेशात हिंदू मंदिरे, घरे, दुकानांवर जमावाचे हल्ले -• बांगलादेशमध्ये सोमवारी काही हिंदू देवळे, हिंदूंची घरे, दुकाने, कार्याल यांवर जमावाने हल्ले केल्याच्या घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सिंराजगंज, रंगपूर येथे अवामी लीगच्या दोन हिंदू नेत्यांची हत्या करण्यात आली, अशी माहिती बांगलादेश हिंदू बुद्धिस्ट ख्रिश्चन युनिटी कॉन्सिलचे नेते काजोल देबनाथ यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी हिंदू महिलांनाही मारहाण केली बांगलादेशातील हिंदूंची स्थिती चिंताजनक असल्याचा दावा त्यांनी केला. हल्लेखोरांनी ढाका येथील इंदिरा गांधी कल्चरल सेंटरची नासधूस केली. हल्ल्यात चार हिंदू मंदिरांचे किरकोळ नुकसान झाले.