ऑनलाइन लोकमत -
ढाका, दि. 26 - बांगलादेश पोलिसांनी दहशतवादी लपलेल्या ठिकाणी हल्ला करत 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मंगळवारी सकाळी पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली. दोन तास पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. यामध्ये 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती ढाका मेट्रोपोलिटन पोलीस उपायुक्त मसूद अहमद यांनी दिली आहे. कल्याणपूर परिसरातदेखील पोलिसांनी छापा टाकून एका दहशतवाद्याला अटक केली आहे.
मध्यरात्री पोलीस छापा टाकत असताना संशयितांनी त्यांच्यावर बॉम्ब टाकला होता. त्यानंतर पोलिसांनी इमारतीला घेराव घातला होता. 'दहशतवादी रात्रभर फायरिंग करत होते. सोबतच अल्लाहू अकबरच्या घोषणाही देत होते. सकाळी पोलिसांनी स्टॉर्म 26 ऑपरेशनला सुरुवात केली आणि सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळालं', अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सर्व 10 जण इस्लामी जहालमतवादी गटाचे सदस्य आहेत असं पोलीस उपायुक्त मसूद अहमद यांनी सांगितलं आहे, मात्र ते कोणत्या गटाचे सदस्य आहेत हे सांगण्यास नकार दिला.