आरक्षणाविरोधात पेलटेल्या आंदोलनाची परिणती हिंसाचारात होऊन अखेर सोमवारी बांगलादेशमध्ये नाट्यमयरीत्या सत्तांतर झालं. शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. तर पंतप्रधानांच्या राजीनाम्यानंतर सत्तेची सर्व सूत्रं लष्कराने आपल्या ताब्यात घेतली आहेत. आता काळजीवाहू सरकारची स्थापनाही लष्कराच्या देखरेखीखाली होणार आहे. दरम्यान, बांगलादेशमधील सत्तांतर आणि शेख हसीना यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट करण्यामध्ये एका २६ वर्षाय तरुणाने मोठी भूमिका बजावली आहे. या तरुणाचं नाव आहे नाहिद इस्लाम. नाहिद हा विद्यार्थी नेता आहे. तसेच तो स्टुडंट अगेन्स डिस्क्रिमिनेशन या विद्यार्थी संघटनेचा समन्वयक आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर नाहिद याने पुढच्या २४ तासांमध्ये काळजीवाहू सरकार स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे.
नाहिद इस्लाम हा ढाका विद्यापीठामधील समाजशास्त्र विभागाचा विद्यार्थी आहे. तसेच तो शेख हसीना यांना ज्या आंदोलनामुळे राजीनामा द्यावा लागला त्या आंदोलनाचा मुख्य चेहरा आहे. मानवाधिकारांच्या रक्षणासंबंधीच्या कार्यामुळे त्याला विशेष ओळखलं जातं. तसेच विद्यार्थ्यांसोबत होत असलेल्या भेदभावाविरोधातील आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयकांपैकी तो एक आहे. बांगलादेशमधील सरकारी नोकऱ्यांमध्ये कोटा पद्धतीमध्ये सुधारणांची मागणी या आंदोलकांकडून करण्यात येत होती. बांगलादेशमधील सर्वोच्च न्यायालयाने जून महिन्यामध्ये १९७१ च्या युद्धातील स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ३० टक्के कोटा देण्याचा निर्णय दिला होता. तेव्हापासून बांगलादेशमध्ये आरक्षणविरोधी आंदोलनाला तोंड फुटले होते.
दरम्यान, नाहिद इस्लाम याने शेख हसीना यांच्या पक्षाविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेतली होती. त्याने शाहबाग येथे आंदोलकांना संबोधित करताना आज काठी उचलली आहे. काठीनं काम झालं नाही तर शस्त्र हातात घेऊ असा इशाराही दिला होता. या आंदोलनादम्यान नाहिदची काही वेळा धरपकडही झाली होती. तसेच त्याची चौकशी करून त्याला यातनाही देण्यात आल्या होत्या. मात्र सुटका झाल्यानंतर नाहिद इस्लामने हे आंदोलन अधिकच तीव्र केलं. तसेच त्याची परिणती अखेरीस शेख हसीना यांच्या राजीनाम्यामध्ये आणि देश सोडून जाण्यामध्ये झाली.