बांगलादेशात (Bangladesh) हिंदूंविरोधातील हिंसाचार थांबण्याचे नाव नाही. आज सकाळी काही मंदिरांत तोड-फोड झाल्याचे वृत्त होते. आता हल्लेखोरांनी दोन हिंदू तरुणांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, धार्मिक हिंसाचारात मरणारांची संख्या आतापर्यंत 6 वर पोहोचली आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. (Two more killed in religious unrest in Bangladesh)
बांगलादेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचाराची ही ताजी घटना दक्षिणेकडील बेगमगंज शहरात घडली. तत्पूर्वी, दुर्गा पूजेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारच्या नमाजनंतर बहुसंख्य समाजातील शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी, 200 हून अधिक लोकांनी इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. तेव्हा हिंदू समाजाचे लोक विजयादशमीनिमित्त रॅली काढण्याची तयारी करत होते. यावेळी, अज्ञात हल्लेखोरांनी मंदिर समितीच्या कार्यकारिणी सदस्याला मारहाण करून त्यांना चाकूने भोसकले. स्थानिक पोलीस अधिकारी शाहिदूल इस्लाम यांनी एएफपीला दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की शनिवारी सकाळी मंदिराशेजारील एका तलावाजवळ आणखी एका हिंदू व्यक्तीचा मृतदेह सापडला. ते म्हणाले, "कालच्या हल्ल्यानंतर आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आम्ही हल्लेखोरांचा शोध घेत आहोत."
कुरानच्या कथित अपमानाच्या अफवेनंतर बांगलादेशात हुंदूंविरोधातील हिंसाचार वाढतच चालला आहे. आधी गेल्या बुधवारी रात्री हाजीगंज येथे एका हिंदू मंदिरावर 500 हल्लेखोरांनी हल्ला केला. यादरम्यान मंदिरात तोड-फोड करण्यात आली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला होता. आज सकाळी पोलिसांनी आणखी दोन हिंदू तरुणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. यानंतर आता या हिंसाचारत एकूण 6 हिंदू नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 150 वर हिंदू जखमी झाले आहेत.