बांगलादेशात बुथवारी एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली आहे. येथे निदर्शकांच्या एका मोठ्या टोळक्याने, बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या ढाक्यातील घरात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली आणि नंतर या घराला आग लावली. महत्वाचे म्हणजे, त्यांची (मुजीबुर रहमान) मुलगी तथा पदच्युत पंतप्रधान शेख हसीना लोकांना 'ऑनलाइन' संबोधित करत असताना ही घटना घडली.
शेख हसीना या बुधवारी रात्री ९ वाजता ऑनलाइन भाषण देणार आहेत, अशी माहिती बांगलादेशात मिळाल्यानंतर, शेख हसीना यांच्या विरोधातील गट सक्रिय झाला. यानंतर, हसीना यांच्या भाषणाविरोधात सोशल मीडियावर 'बुलडोझर रॅली'चे आवाहन करण्यात आले. यानंतर, सायंकाळपासूनच राजधानीतील धानमंडी भागात असलेल्या शेख मुजीबुर रहमान यांच्या घरासमोर हजारो लोक जमले होते. त्यांनी बरोबर हसीना यांच्या भाषणाच्या आधीच, या घरात तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली. महत्वाचे म्हणजे, बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनीच शेख मुजीबुर रहमान यांचे निधन झाले होते. १९७५ साली त्यांची हत्या झाली होती. यानंतर, ढाका येथील त्यांच्या निवासस्थानाचे स्मारक संग्रहालयात रूपांतर करण्यात आले होते.
"मी तुमच्यासाठी काहीच केलं नाही का?" -अवामी लीगची विसर्जित विद्यार्थी संघटना 'छात्र लीग'ने शेख हसीना यांच्या या भाषणाचे आयोजित केले होते. माजी पंतप्रधान हसिना यांना भाषणापूर्वीच, त्यांच्या वडिलांच्या घराची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची माहिती मिळाली होती. यामुळे त्या प्रचंड भडकलेल्या दिसल्या. त्या म्हणाल्या, "मी तुमच्यासाठी काहीच केले नाही का? मी काम केले नाही का? मग माझ्या वडिलांनी स्वातंत्र्याचा नारा ज्या घरातून दिला, त्याची तोडफोड का करण्यात आली? मला न्याय हवा आहे."
"इतिहास बदला घेत असतो" -शेख हसीना यांनी आपल्या संबोधना देशवासीयांना सध्याच्या राजवटीविरुद्ध संघटित शक्तीने प्रतिकार करण्याचे आवाहन केले. बांगलादेशातील मुहम्मद युनूस यांच्या सध्याच्या सरकारसंदर्भात बोलताना हसीना म्हणाल्या, "त्यांच्यात अद्यापही एवढी ताकद नाही की ते, जो राष्ट्रध्वज, जे संविधान आणि जे स्वातंत्र्य, लाखो हुतात्म्यांच्या बलिदानाने मिळाले आहे, ते बुलडोझरच्या सहाय्याने नष्ट करू शकतील. ते इमारत उद्धवस्त करू शकतात, मात्र, इतिहास नाही. इतिहास सूड घेत असतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे."