बांगलादेशमध्ये काही दिवसापासून नोकरीतील आरक्षणावरुन निदर्शने सुरू आहेत, या आंदोलनामुळे शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. यामुळे देशात सत्तांत्तर झाले.हिंसाचाराची आग शांत झाल्यानंतर आता आणखी एक नवीन मुद्दा तापला आहे. आता देशाच्या राष्ट्रगीतावरुन नवा वाद सुरू झाला आहे.
आता बांगलादेशात 'आमार सोनार बांगला' या राष्ट्रगीतावरून गदारोळ सुरू आहे. जमात-ए-इस्लामीचे माजी अमीर गुलाम आझम यांचे पुत्र अब्दुल्लाहिल अमान आझमी यांनी बांगलादेशचे राष्ट्रगीत आणि संविधानात बदल करण्याची मागणी केली आहे.
"भारत थांबवू शकतो रशिया-युक्रेन युद्ध", इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे मोठे वक्तव्य
जनरल अमन आझमी म्हणाले, “मी राष्ट्रगीताचा मुद्दा या सरकारवर सोडतो. आपले सध्याचे राष्ट्रगीत हे आपल्या स्वतंत्र बांगलादेशच्या अस्तित्वाच्या विरुद्ध आहे. हे बंगालच्या फाळणीची आणि दोन बंगालच्या विलीनीकरणाची वेळ दर्शवते. दोन बंगालांना एकत्र करण्यासाठी तयार केलेले राष्ट्रगीत स्वतंत्र बांगलादेशचे राष्ट्रगीत कसे असू शकते?', असा सवालही केला आहे.
आझमी पुढे म्हणाले की, हे राष्ट्रगीत भारताने १९७१ मध्ये आपल्यावर लादले होते. अशी अनेक गाणी आहेत जी राष्ट्रगीत म्हणून काम करू शकतात. नवीन राष्ट्रगीत निवडण्यासाठी सरकारने नवीन आयोग स्थापन करावा. बांगलादेशचे राष्ट्रगीत प्रसिद्ध बंगाली संगीतकार रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील धार्मिक बाबींचे सल्लागार अबुल फैज मुहम्मद खालिद हुसेन यांनी शनिवारी सांगितले की, देशाचे राष्ट्रगीत बदलण्याची कोणतीही योजना नाही. पद्मा नदीच्या उत्तरेकडील राजशाही येथील इस्लामिक फाऊंडेशनला भेट दिल्यानंतर स्थानिक प्रसारमाध्यमांनी हुसैन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, अंतरिम सरकार वाद निर्माण करण्यासाठी काहीही करणार नाही, आम्हाला सर्वांच्या सहकार्याने एक सुंदर बांगलादेश तयार करायचा आहे.
बांगलादेशातील हिंदू समुदायाला लक्ष्य करणारे हल्ले अजूनही सुरू असल्याची माहिती समोर आली. यावर बोलताना हुसैन म्हणाले,अशा घटनांमध्ये दोषी आढळलेल्यांना मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारकडून शिक्षा केली जाईल. प्रार्थनास्थळांवर हल्ले करणारे हे मानवतेचे शत्रू आहेत. ते गुन्हेगार आहेत आणि सध्याच्या कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.