बांगलादेशातील बिघडलेल्या राजकीय वातावरणात हिंदूंना भेदभाव आणि धमक्यांचा सामना करावा लागत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या एका वृत्तानुसार, बांगलादेशातहिंदूंना केवळ भेदभावाचाच नाही, तर शारीरिक हिंसाचारापासून ते सामाजिक बहिष्कारापर्यंतच्या धमक्या मिळत आहेत. याच बरोबर त्यांची बदनामी करण्यासाठीही विविध प्रकारच्या मोहिमा चालवल्या जात आहेत.
सत्तापालटानंतर कट्टरतावाद्यांची ताकद वाढली -गेल्या 5 ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान शेख हसीना यांची सत्ता उलथून टाकल्यानंतर नोबेल शांतता पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने सत्तेची धुरा सांभाळली. यानंतर येथील कट्टरतावादी गटांना बळकटी मिळाली आणि देशात हिंसाचार आणि धार्मिक अल्पसंख्याकांविरुद्ध भेदभावाच्या घटना वाढल्या.
जीवे मारण्याची धमकी देऊन घेतले जातायत राजीनामे - माध्यमांतील वृत्तांनुसार, चटगाव विद्यापीठाच्या इतिहास विभागातील सहाय्यक प्राध्यापक रोंटू दास यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले. याशिवाय त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. सहाय्यक प्राध्यापक रोंटू दास यांनी आपल्यासोबत झालेल्या भेदभावाचा उल्लेख करत राजीनामा दिला. यानंतर तो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला.
हिंदू पोलिसांनाही केलं बडतर्फ -बांगलादेशात हा भेदभाव शैक्षणिक संस्थांबरोबरच, पोलीस खात्यातील हिंदू हिंदू कॅडेट्ससोबतही दिसून आला आहे. नुकतेच शारदा पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 252 पोलीस उपनिरीक्षकांना अनुशासनहीनता आणि अनियमिततेचा आरोप करत बडतर्फ करण्यात आले आहे. 252 उपनिरीक्षकांपैकी 91 हिंदू कर्मचारी होते. या सर्वांची नियुक्ती माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या कार्यकाळात झाली होती.
"बांगलादेशात हिंदूंविरोधात शत्रुत्वाचे वातावरण तयार होत आहे" -यातच, बांगलादेशात हिंदूंविरोधात शत्रुत्वाचे वातावरण तयार होत आहे. यामुळे हिंदूंना त्यांच्या नोकऱ्या आणि इतर संधी गमवाव्या लागत आहेत, असा दावा हिंदू समुदायाकडून करण्यात येत आहे. यावर, कट्टरतावादी गटांनी विरोध करत, शेख हसीना यांच्या गत सरकारने त्यांच्या पक्षाच्या जवळच्या लोकांना नियुक्त केले होते, असा आरोप केला आहे.