Bangladesh Army Rule :बांगलादेशात लष्करानं सध्या अंतरिम सरकार स्थापन केलं आहे. या अंतरिम सरकारमध्ये १० जणांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून यामध्ये पत्रकार आणि अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. आता हे १० सदस्य बांगलादेशातील सरकार चालवणार आहेत. यामध्ये हिंदू समाजाच्या प्रतिनिधींचाही समावेश आहे.
बांगलादेशच्या नव्या सरकारचे नेतृत्व डॉ. सलीमुल्ला खान आणि डॉ. आसिफ नजरुल करणार आहेत. याशिवाय, निवृत्त न्यायाधीश मोहम्मद अब्दुल वहाब मिया, निवृत्त लष्कर जनरल इक्बाल करीम, निवृत्त मेजर जनरल सय्यद इफ्तिखार उद्दीन, डॉ. देबप्रिय भट्टाचार्य, मतिउर रहमान चौधरी, ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) एम सखावत हुसेन, डॉ हुसैन जिल्लूर रहमान आणि न्यायाधीश एम.ए. मतीन हे नवीन सरकार चालवणार आहेत.
दरम्यान, पंतप्रधान पदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना या बांगलादेश सोडून भारतात आल्या आहेत. त्यामुळं जमात-ए-इस्लामीनं धमकी दिल्यानं तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेख हसीना यांना जो देश आश्रय देईल, त्या देशाच्या दूतावासाला घेराव घालू, कर्मचाऱ्यांना बाहेर पडू देणार नाही, असं जमात-ए-इस्लामीनं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत भारतीय दूतावासाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अंतरिम सरकारमध्ये हिंदू सदस्यडॉ. देबप्रिय भट्टाचार्य हे अर्थतज्ज्ञ असून ते हिंदू कुटुंबातील आहेत. शेख हसीना यांच्या सरकारमध्ये ते आर्थिक धोरणांचे सल्लागारही राहिले होते. त्यांचे वडील वकील आणि आई बांगलादेशच्या खासदार आहेत. ते संयुक्त राष्ट्रात बांगलादेशचे स्थायी प्रतिनिधीही होते. याचबरोबर, डॉ. सलीमुल्लाह खान हे बांगलादेशी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ आहेत. ते बंगाली मुस्लिम कुटुंबातील असून त्यांनी ढाका विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतले आहे. डॉ. आसिफ नजरुल हे बांगलादेशी लेखक आणि पत्रकार आहेत. तसंच, नव्या सरकारमध्ये पाच निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
आणीबाणी लागू केली जाणार नाहीदरम्यान, देशातील तणावपूर्ण परिस्थिती आणि हिंसक निदर्शनं पाहता लष्करानं मोठं वक्तव्य केलं आहे. देशात सध्या कोणतीही आणीबाणी लागू केली जाणार नाही. निवडणुकीची चर्चा करणं खूप घाईचं आहे. सध्या लष्कर तात्पुरतं सरकार चालवेल. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा निर्णय घेतला जाईल, असं लष्करानं म्हटलं आहे.