Bank Robbery:रशियातून बँक दरोड्याच्या एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. महिलेने ज्या बँकेत अनेक वर्षे काम केले, त्याच बँकेत तिने कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारला. विशेष म्हणजे, पैसे चोरल्यानंतर तिने पैशांच्या बॅगांमध्ये रद्दी भरुन ठेवली. दरोड्यानंतर परदेशात पळून गेलेल्या महिलेला घटनेच्या चार वर्षानंतर पकडून परत आणले.
'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, इनेसा ब्रँडनबर्ग नावाच्या महिलेने तिच्या साथीदारासोबत मिळून बँकेवर दरोडा घातला. ती आणि तिचा साथीदार त्या बँकेमध्ये फक्त कामच करत नव्हते, तर त्या बँकेच्या संचालक मंडळात होते. ते दोघे बँकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये सहभागी असल्यामुळे सुरुवातीला कुणालाही त्यांच्यावर संशय आला नाही. पण, या दोघांनी बँकेतून सुमारे 68 कोटी रुपये चोरले आणि त्याऐवजी कागदाचे तुकडे तिजोरीत ठेवले.
इनेसा आणि तिच्या साथीदाराची चोरी पकडण्यापूर्वीच ती खासगी जेटने स्पेनला पळून गेली. मात्र, घटनेच्या चार वर्षानंतर आरोपी महिलेला देशात परत आणण्यात आले आहे. या दरोड्यात इनेसाला बँकेचा सहमालक आणि बोर्ड चेअरमन, रोमायत याने मदत केली. या प्रकरणी यापूर्वीच तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. रोमायत या चोरीचा मास्टरमाइंड असल्याचे समोर आले आहे.