Bao Fan Goes Missing: चीनमधील अब्जाधीशांच्या बेपत्ता होण्याचं सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. २ वर्षांपूर्वी अलीबाबाचे संस्थापक जॅकमा बेपत्ता झाले होते आणि सरकार अद्यापही त्यांचा शोध घेत होते. अशातच अलीकडेच हाय-प्रोफाइल बँकर बाओ फॅन बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली. त्यांच्या बेपत्ता झाल्याची बातमी त्यांच्या कंपनीनेच दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये सरकारविरोधात आवाज उठवणारा 'गायब' होतो. अशा परिस्थितीत बाओ फॅन बेपत्ता होण्यामागे चीनच्या शी जिनपिंग सरकारचा हात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. बीबीसीच्या बातमीनुसार, कंपनीने गुरुवारी शेअर बाजारात बाओ यांच्याबद्दल माहिती दिली आहे. तेव्हापासून कंपनीचे शेअर्स ५० टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला सांगितलं की चायना रेनेसान्स होल्डिंग्सचे सीईओ बाओ फॅन यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान ते किती काळापासून बेपत्ता आहेत याची माहिती देण्यात आली नाही. चिनी वृत्तसंस्था कॅक्सिननं सूत्रांचा हवाला देऊन सांगितलं की कर्मचारी दोन दिवसांपासून त्यांच्याशी संपर्क साधू शकले नाहीत.
कोण आहेत बाओ फॅन?बाओ बेपत्ता झाल्यामुळे कंपनीच्या गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आणि कंपनीने शेअर बाजाराला माहिती दिल्यानंतर शुक्रवारी हाँगकाँग स्टॉक एक्सचेंजमध्ये चायना रेनेसान्सचे शेअर्स ५० टक्क्यांनी घसरले. बाओ यांच्या बेपत्ता होण्यामागे कोणतं मोठं षडयंत्र आहे का नाही याबाबत माहिती नसल्याचंही बीबीसीनं म्हटलंय.
जॅक मा यांच्यासारखी घटनाबाओ यांच्याबद्दल ऐकल्यानंतर अनेकांच्या डोक्यात जॅक मा यांचं नाव आलं असेल. चीनी कंपनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा हे देखील २०२० मध्ये अचानक गायब झाले. अनेक महिने गायब झाल्यानंतर ते कधी जपानमध्ये तर कधी थायलंडमध्ये दिसले. पण २०२० पासून ते सार्वजनिक जीवनापासून दूर आहेत.