ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 19 - भारत आणि अमेरिकेतील संबंध अधिक चांगले होण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. बुधवारी फोनवरुन संपर्क साधून ओबामा यांनी नरेंद्र मोदी यांना धन्यवाद केले.
'संरक्षण, अणू ऊर्जासाठी सहकार्य करुन संयुक्तरित्या पुनरावलोकन करण्यात आले, शिवाय दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये संपर्क वाढवण्यावर भर देण्यात आला', याबाबत ओबामा यांनी मोदींना फोनवरुन संपर्क साधून त्यांचे आभार मानले. 2015 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी बराक ओबामा यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण देण्यात आले होते.
या अविस्मरणीय क्षणांची आठवण काढून ओबामा यांनी मोदींना येणा-या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. आर्थिक आणि सुरक्षेच्या मुद्द्यांना प्राधान्य देत यात आणखी प्रगती करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही देशांच्या नेत्यांनी फोनवर बातचित केल्याची माहिती, व्हाइट हाऊसने दिली.
मोदी-ओबामा भेटीचा रेकॉर्ड
दरम्यान, 2014 मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी विजयी झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी अन्य देशांच्या अध्यक्षांनी फोन, सोशल मीडियाद्वारे त्यांचे अभिनंदन केले होते. यावेळी ओबामा यांनीही मोदींना फोनकरुन निवडणुकीतील त्यांच्या यशाबाबत शुभेच्छा देत अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. त्यानंतर सप्टेंबर 2014 मध्ये मोदी आणि ओबामा यांची व्हाइट हाऊसमध्ये भेट झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत या दोघांच्या एकूण आठ वेळा गाठीभेटी झाल्या आहेत. भारत-अमेरिकेच्या प्रमुख नेत्यांमधील भेटीबाबतचा हा एक रेकॉर्ड असल्याचे म्हटले जात आहे.