अंतराळात यूएफओ (UFO) दिसल्याच्या मुद्द्यावरुन सुरू असलेल्या जागतिक पातळीवरील वादात आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी महत्वपूर्ण विधान केलं आहे. एलियन्सचं अस्तित्व जर सिद्ध झालं तर जगात अनेक लोकांच्या धार्मिक भावना बदलतील आणि जगभरात स्वत:ला संरक्षणदृष्टा समृद्ध करण्यासाठी संरक्षण सामग्रीवर वारेमाप खर्च केला जाईल, असं विधान बराक ओबामा यांनी केलं आहे. एलियन्सच्या अस्तित्वामुळे पृथ्वीवर क्रांतीकारी बदल घडतील असंही ते म्हणाले. (Barack Obama Says Proof Of Aliens & Ufo Will Lead To New Religions And Military Spending)
एलियन्सचं अस्तित्व सिद्ध झालं तर नव्या धर्मांचा उदय होईल. यासोबतच एलियन्समुळे होणाऱ्या धोक्याला सामोरं जाण्यासाठी जगात शस्त्रास्त्रांची मागणी लक्षणीयरित्या वाढेल. यात देश शस्त्रास्त्र खरेदीसाठी वारेमाप खर्च करत सुटतील, असं ओबामा म्हणाले. यासोबतच एलियन्सच्या अस्तित्वानं वैयक्तिक आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र बदलणार नाही, असंही ते म्हणाले. अमेरिकेच्या सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी अनेकदा यूएफओ दिसल्याची माहिती दिल्याचा मुद्दा ताजा असतानाच बराक ओबामा यांनी एलियन्सबाबतचं हे विधान करुन खळबळ उडवून दिली आहे. यूएफओबाबत कोणतीही माहिती नाही: गुप्तचर अधिकारी
न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बराक ओबामा यांना एलियन्स जर पृथ्वीवर आले तर त्याबाबत तुमचं मत काय? असा प्रश्न विचारला होता. त्यावर ओबामा यांनी तो क्षण अतिशय रोमांचक असेल असं म्हटलं. "एलियन्स असल्याचं सिद्ध झालं तर माझे विचार पूर्णपणे बदलणारी घटना ठरेल. कारण आजवर मी संपूर्ण अंतराळात आपल्याच ग्रहावर जीवंत प्राण्यांचं अस्तित्व आहे असं मानत आलो आहे. पण यात कोणतच दुमत असू शकत नाही की असं जर झालं तर आपल्याला शस्त्रास्त्रांच्याबाबतीत पूर्णपणे सज्ज राहावं लागेल. इतकंच नव्हे, तर एलियन्सच्या येण्यानं नव्या धर्मांचाही इथं उगम होईल", असं ओबामा म्हणाले.
दरम्यान, अमेरिकेच्या सैनिकांना आकाशात यूएफओ दिसल्याचं वृत्त सीबीएस न्यूजनं दिलं होतं. तर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या तपासात अशाप्रकारचं कोणत्याही यूएफओच्या अस्तित्वाचा पुरावा सापडला नसल्याचं म्हटलं आहे.