Bashar al Assad News: हयात तहरीर अल शाम संघटनेने सीरियातून राष्ट्रपती बशर अल असाद यांची सत्ता उलथून टाकली. बंडखोरांनी राजधानी दमास्कस ताब्यात घेण्यापूर्वीच बशर अल असाद देश सोडून फरार झाले. दमास्कस विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर त्यांचे विमान रडाडरवरून गायब झाले होते. सीरियातून पळून गेलेले असाद यांनी कोणत्या देशात आश्रय घेतला याबद्दल माहिती समोर आली आहे.
सीरियात मागील ११ दिवसांपासून गृहयुद्ध पेटले होते. हयात तहरीर अल शामचे बंडखोर आणि लष्करामध्ये संघर्ष सुरू झाला होता. बंडखोरांनी सीरियाच्या लष्कराला मात देत महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवला आणि रविवारी (८ डिसेंबर) राजधानी दमास्कर ताब्यात घेत असाद यांची सत्ता उलथवून टाकली.
बंडखोर दमास्कसमध्ये येण्यापूर्वीच असाद झाले फरार
दमास्कस ताब्यात घेण्यापूर्वी हयात तहरीर अल शामच्या बंडखोरांनी सीरियातील पाच महत्त्वाची शहरे ताब्यात घेतली. त्यानंतर दमास्कसकडे त्यांनी कूच केली. बंडखोर राजधानीकडे निघालेले असतानाच असाद हे दमास्कस विमानतळावरून खासगी विमानाने पळून गेले.
बशर अल असाद यांचे विमानाचा संपर्क तुटला होता. त्यामुळे त्यांचे विमान अपघातग्रस्त झाल्याचे अंदाजही व्यक्त केले गेले. पण, आता रशियातील वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार बशर अल असाद यांनी रशियातील मॉस्कोमध्ये आश्रय घेतला आहे.
असाद आणि त्यांचे कुटुंब मॉस्कोमध्ये आले आहे, असे वृत्त क्रेमलिनमधील सूत्रांच्या हवाल्याने रिया नोवोस्ती वृत्तसंस्थेने दिले आहे. रशियाने त्यांना मानवतावादी दृष्टीने आश्रय दिला असल्याचेही सूत्रांनी सांगितले. क्रेमलिन हे रशियाच्या अध्यक्षांचे शासकीय निवासस्थान आहे.
रशिया सीरियातील लताकिया प्रांतात असलेल्या हमीमिम हवाई दलाच्या विमानतळांचे संचलन करतो. त्याचा वापर बंडखोरांविरोधातील मोहीम चालवण्यासाठी झाला आहे. क्रेमलिनच्या सूत्रांनी सांगितले की, रशियन लष्करी छावण्या आणि दूतावासातील अधिकाऱ्यांना सुरक्षा देण्याचे बंडखोरांनी ग्वाही दिली आहे.