ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 19 - भारतीय लष्कराने केलेली सर्जिकल स्ट्राइक आणि भारत सरकारच्या आक्रमक परराष्ट्र नीतीमुळे आंतरराष्ट्रीय मंचावर एकाकी पडलेले पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना आता पाकिस्तानमध्येही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इम्रान खानच्या पाकिस्तान तहरिक ए इंसाफ (PTI) पक्षाने शरीफ कुटुंबावर मनी लाँडरिंगचा आरोप करत आंदोलनाची घोषणा केली आहे. तर दफा-ए-पाकिस्तान काऊंन्सिलने (DCP) जम्मू आणि काश्मीरमध्ये भारताकडून होत असलेल्या अत्याचारांविरोधात इस्लामाबादमध्ये विरोध प्रदर्शन करण्याची योजना आखली आहे.
शरीफ कुटुंबीयांविरोधात पाकिस्तान तहरिक-ए-इंसाफ पक्षाने 2 नोव्हेंबर रोजी इस्लामाबाद बंदची घोषणा केली आहे. तर 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरामाइंड असलेल्या हाफिज सईदच्या जमात-उल-दावाची सहयोगी असलेल्या दफा-ए-पाकिस्तान काऊंन्सिल या पक्षाने 27 आणि 28 ऑक्टोबरला इस्लामाबाद आणि मुझफ्फराबाद येथे सभा आयोजित करून विरोध प्रदर्शन करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, "या सभांचे आयोजन करण्यासाठी इस्लामाबादच्या जिल्हा प्रशासनाकडून परवानगीची औपचारिकता पूर्ण केली जाईल," असे जमात-उल-दावाचा प्रवक्ता असिफ खुर्शेद याने सांगितले.
दरम्यान, महिन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानी दैनिक 'डॉन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार दहशतवाद्यांकडून भारत आणि अफगाणिस्तानमध्ये होत असलेल्या कारवायांना आळा घालण्यास आलेल्या अपयशावरून पाकिस्तान सरकार आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये वाद उद्भवला होता. 6 ऑक्टोबरला आलेल्या या वृत्तानुसार शरीफ सरकारने जेहादी आणि दहशतवाद्यांना मदत न करण्याची सूचना केली होती. अन्यथा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकाकी पडण्याची भीती व्यक्त केली होती.