लंडन- अभिनेते शशी कपूर यांच्या निधनाची बातमी देताना बीबीसीकडून चूक झाली. बीबीसीने शशी कपूर यांची बातमी देताना दोन चुकीच्या क्लिप्स दाखविल्या होत्या. या चुकीवर बीबीसीने चोवीस तासाने माफी मागितली आहे. सोमवारी ह्यू एडवर्ड्स हे बीबीसीचे निवेदक शशी कपूर यांचं निधन झाल्याची बातमी देत होते. त्यावेळी दोन चुकीच्या व्हिडीओ क्लिप बातमीसाठी वापरण्यात आल्या होत्या.
बीबीसीने बातमी देताना वापरलेल्या दृश्यांमध्ये शशी कपूर कुठेही दिसत नव्हते. त्या दृश्यात अभिनेते ऋषी कपूर व अमिताभ बच्चन जास्त दिसत होते. बीबीसीकडून झालेली ही चूक त्यांनी मंगळवारी मान्य केली. बीबीसीचे प्रोग्राम एडिटर पॉल रॉयल यांनी मंगळवारी ट्विटरवरून याबद्दलची माफी मागितली. चुकीची दृश्य असलेलं बुलेटिन ऑनएअर गेल्याच्या काही तासातच त्यांनी माफी मागितली आहे.
बीबीसी न्यूज 10कडून शशी कपूर यांच्या निधनाची बातमी देताना फोटोच्या बाबतीत झालेल्या चुकीबद्दल आम्ही श्रमस्व आहोत, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
शशी कपूर यांच्या निधनाची बातमी देताना प्रसिद्ध इंग्रजी वृत्तवाहिनीकडूनही चूक झाली होती. या वाहिनीने ट्विटरवर ट्विट करून बातमी देताता शशी कपूर यांच्याऐवजी शशी थरूर यांचं नाव लिहिलं होतं. त्यांच्या या ट्विटमुळे शशी थरूर यांच्या कार्यालयात सात्वन करणारे फोन येत होते. वृत्तवाहिनीची ही चूक शशी थरूर यांनी ट्विट करून लक्षात आणून होती. तसंच ठणठणीत असल्याचंही ट्विटरवरून सांगितलं होतं.