ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी शुक्रवारी फोन केला आणि डिसेंबरमध्ये भारतात क्रिकेट सामने खेळण्यासाठी निमंत्रण दिले अशी माहिती दिली आहे. आधीच्या योजनेनुसार भारत पाक सामने दुबईमध्ये भरवण्यात येणार होते, परंतु त्याऐवजी ते भारतातच खेळावेत असा प्रस्ताव बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दिल्याचे खान म्हणाले.
केंद्र सरकारने या सामन्यांसाठी अनुमती दिली असल्याचे मनोहर म्हणाल्याचेही खान यांनी सांगितले.
भारतामध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंना चोख सुरक्षा पुरवली जाईल याची हमी मनोहर यांनी दिली आहे. मोहाली व कोलकाता सारख्या मैदानांवर सामन्यांचे आयोजन केले जाईल, ज्याठिकाणी पाकिस्तानी संघाला खेळण्यासाठी फारसा विरोध झालेला नाही.
वास्तविक ही होम सीरीज पाकिस्तानची असून ती दुबईमध्ये खेळवण्याचा मूळ करार होता, असं असताना आम्ही बारतात का खेळावं असा प्रश्न शहरयार खान यांनी उपस्थित केला. त्यावर पाकिस्तानचं कुठलंही आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आता मनोहर यांच्या प्रस्तावावर पाकिस्तान बोर्ड निर्णय देईल असे खान म्हणाले. भारतामध्ये न खेळता अरब अमिरातीमध्येच सामने खेळवावेत असा मतप्रवाह पाकिस्तानच्या बोर्ड सदस्यांचा असल्याचे समजते.