नवी दिल्ली - तुम्ही फेसबुक वापरत असाल तर सगळ्यांनी आपल्या फेसबुकचा पासवर्ड तातडीने बदलावं कारण फेसबुकच्या करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची बातमी आहे. फेसबुकच्या 60 कोटी युजर्सचा पासवर्ड फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती पडला आहे त्यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते.
इकोनॉमिक्स टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार फेसबुकने आपल्या 20 ते 60 कोटी युजर्सचा पासवर्ड टेक्स्ट फॉरमॅटमध्ये सेव्ह करुन ठेवला होता. हाच टेक्स्ट फॉरमॅटमधील डेटा फेसबुकच्या कर्मचाऱ्यांमध्ये लीक झालेला आहे. अद्याप फेसबुककडून याची माहिती युजर्सना देण्यात आली नाही.
मात्र डेटा लीक झाल्यानंतर फेसबुकने आपली चूक मान्य करत युजर्सला नोटिफिकेशन पाठवून पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे अशी माहिती फेसबुकने दिली. तसेच या डेटा लीक प्रकरणाची पुढील दोन महिन्यात सखोल चौकशी केली जाईल असंही फेसबुकने सांगितले आहे.
सोशल मिडीयामध्ये फेसबुक माध्यम लोकप्रिय मानलं जातं. मागील वर्षी तब्बल 5 कोटी युजर्सची माहिती चोरीला गेल्याचा धक्कादाक प्रकार समोर आला होता. मात्र, यापैकी तीन कोटीच युजर्सची माहिती चोरीला गेल्याची माहिती फेसबुकने दिली होती. भारतात सध्याच्या घडीला 16 कोटींहून अधिक फेसबुक युजर्स आहेत.
फेसबुकने यापूर्वीही अशा अनेक चुका करुन जनतेची माफी मागितल्याची उदाहरणे आहेत. फेसबुकच्या एका छोट्याशा तांत्रिक चुकीमुळे तब्बल ६८ लाख लोकांचे गोपनीय आणि वैयक्तिक फोटो सार्वजनिक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती त्यावेळीही फेसबुकने युजर्सची माफी मागितली होती.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंब्रिज अॅनालिटिकाद्वारे फेसबुकचा डेटा लिक झाल्याचे समोर आलं होतं. यामुळे भारतासह अनेक देशांत खळबळ उडाली. फेसुबक डेटा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरत असल्याचं समोर आलं होतं मात्र त्यावेळी डेटा चोरीची आपल्याला माहिती नव्हती, असे सांगत फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी माफीही मागितली होती.