ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 30 - आजकाल मॅरेथॉनमध्ये धावणं म्हणजे फॅशनच झाली आहे. कोणीही उठतो आणि कसलीही पुर्वतयारी किंवा सराव न करता मॅरेथॉनमध्ये सहभागी होत असतो. तुम्हालाही जर का अशी सवय असेल तर आत्ताच सावधान होण्याची गरज आहे. कारण मॅरेथॉनमध्ये धावल्याने शरिरावर येणारा ताण तुमची किडनी खराब करु शकतो. किडनीला जखम होऊन तुमच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. संशोधकांनी हा निष्कर्ष काढला असून यामध्ये एका भारतीयाचाही समावेश आहे.
संशोधकांनी यासाठी 2015 हार्टफोर्ड मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या धावपटूंची तपासणी केली होती. संशोधकांच्या टीमने 26 आणि 42 किमी धावणा-या धावपटूंच्या रक्त आणि लघवीचे नमुने घेतले होते. यावेळी किडनीला होत असलेल्या वेगवेगळ्या जखमांची माहिती समोर आली.
संशोधकांनी केलेल्या अभ्यासात मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या 82 टक्के धावपटूंना पहिल्या स्टेजवरील अॅक्यूट किडनी इंज्युरी (एकेआय) असल्याचं लक्षात आलं. मॅरेथॉन संपल्यानंतर लगेचच त्यांची तपासणी करण्यात आली होती. एकेआय म्हणजे अशी परिस्थिती जेव्हा किडनी रक्तातून कचरा बाजूला करण्यामध्ये अपयशी ठरतं.
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार मॅरेथॉनमुळे किडनी खराब होण्यामागे असलेल्या संभाव्य कारणांमध्ये धावताना शरिराचं तापमान वाढणं, तसंच डिहायड्रेशन किंवा किडनीला होणारा रक्तपुरवठा कमी होणे ही कारणे असू शकतात.
"मॅरेथॉनदरम्यान शारिरीक तणावामुळे किडनी जखमी झाल्याप्रमाणे कार्य करत असते. ज्याप्रमाणे एखाद्या वैद्यकीय गुंतागुंतीमुळे किडनीला जखम झाल्यानंतर रुग्णालयात एखाद्या पेशंटला दाखल करण्यात येते, तशीच काहीशी परिस्थिती त्या धावपटूची झालेली असते", असं येल विद्यापीठाचे प्रोफेसर चिराग पारिख यांनी सांगितलं आहे.
ज्या धावपटूंची तपासणी करण्यात आली त्यांच्या किडनी दोन दिवसानंतर पुन्हा पुर्ववत झाल्याचंही या संशोधनात दिसून आलं. मात्र सध्या वाढत्या मॅरेथॉन आणि त्यांची प्रसिद्धी यामुळे त्याचे परिणाम दूरगामी असू शकतात अशी भीती संशोधकांना वाटत आहे. अमेरिकन जर्नल ऑफ किडनी डिसीजमध्ये संशोधकांचा हा अहवाल छापून आला आहे. याआधी करण्यात आलेल्या अभ्यासांमध्ये मॅरेथॉनचा परिणान ह्रदयावरही होत असल्याचं सांगण्यात आलं होतं.