ऑनलाइन लोकमत -
वॉशिंग्टन, दि. 04 - मित्रांसोबत फिरायला गेलेलो असोत किंवा कुटुंबासोबत डिनर करायला...आठवण म्हणून सेल्फी काढून ठेवणे तसं प्रत्येकालाच आवडतं. पण जर तुम्ही नेहमी सेल्फी काढत असाल तर तुम्हाला 'सेल्फी एल्बो' आजार होऊ शकतो. हा आजार होण्याची फक्त शक्यता आहे असा जर तुमचा समज झाला असेल तर तसं नाही आहे. अमेरिकेतील पत्रकार होडा कोटब यांना हा 'सेल्फी एल्बो' आजार झाला असून जास्त सेल्फी काढल्याने हा आजार झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला आहे.
होडा कोटब यांना गेले काही दिवस हात आणि कोपरात वेदना होत होत्या. त्यानंतर त्यांनी हाडाच्या डॉक्टरला संपर्क साधला. डॉक्टरांना होडा कोटब यांना टेनिस किंवा टेबल टेनिस खेळत असल्यामुळे हा त्रास होत असल्याची शक्यता वाटली. पण होडा कोटब यापैकी कोणताच खेळ खेळत नाहीत. तसंच व्यायामामुळे हा त्रास होत नसल्याचं तपासात जाणवलं. त्यानंतर डॉक्टरांनी होडा कोटब यांच्याशी चर्चा केली असता वारंवार सेल्फी काढल्याने हा त्रास होत असल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला.
जेव्हा आपण सेल्फी काढतो तेव्हा आपला हात आपल्याला एका वेगळ्या स्थितीत ठेवावा लागतो. तसंच जोपर्यंत परफेक्ट फोटो येत नाही तोपर्यंत आपला हात तसाच असतो. अनेकदा तर सलग फोटो काढत असल्याने हात त्याच स्थितीत असतो. होडा कोटब यांनी सध्या कोपराला वारंवार बर्फ लावावा लागत आहे, तसंच विशेष व्यायामही करावा लागत आहे. 'सेल्फी एल्बो'मुळे होणा-या वेदना इतक्या जास्त आहेत की पेनकिलरही घ्याव्या लागत आहेत. 'सेल्फी एल्बो'ने त्रस्त असणा-या होडा कोटब या एकट्या नाही आहेत.
'ही समस्या अनेक लोकांना जाणावत आहे. खुप सेल्फी काढण्यामुळेच हा त्रास जाणवत आहे', असं डॉ जॉर्डन मेट्जल यांनी सांगितलं आहे. खुप काळ टेनिस खेळल्याने ज्याप्रमाणे टेनिस एल्बो होतो, त्याचप्रमाणे खुप सेल्फी काढल्याने सेल्फी एल्बो होतो. सेल्फी काढताना आपल्या हातावर विशिष्ट ठिकाणी खुप जोर पडतो, ज्यामुळे हाडाला सूज येण्याची शक्यता असते.
सेल्फी काढताना कोपरावर जास्त जोर पडू नये यासाठी हात जास्त न लांबवणे योग्य, तसंच नियमित व्यायाम करणे किंवा सेल्फी स्टीक वापरणे ज्यामुळे कोपरावर भार कमी पडेल असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसंच सोशल मिडियापासून काही काळ अंतर ठेवणे हादेखील उत्तम उपाय आहे.