आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणातील वातावरण तापले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अटकेसारखी कुठलीही कारवाई झाल्यास त्यामुळे जगात भयंकर विध्वंस होईल, असा इशारा रशियाचे माजी राष्ट्रपती दिमित्री मेदवेदेव यांनी दिला आहे. पुतिन यांना अटक करण्याच्या प्रयत्नांकडे रशिया युद्धाच्या घोषणेच्या रूपात पाहील, अशी ताकिद मेदवेदेव यांनी दिली आहे.
पुतिन यांना अटक केली गेल्यास रशियन शस्त्रास्त्रे युक्रेनसोबतच आंतरराष्ट्रीय कोर्टावरही हल्ला करतील, असा इशारा मेदवेदेव यांनी दिला आहे. युक्रेनमधील मुलांना डिपोर्ट केल्याच्या आरोपाखाली आयसीसीने व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे. त्याविरोधात पुतिन यांचे निकटवर्तीय असलेल्या मेदवेदेव यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने एक अण्वस्त्रसंपन्न शक्ती असलेल्या देशाच्या राष्ट्रपतींवर खटला चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही त्याचा भाग नाही आहोत. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयातील न्यायाधीशांनी एका अण्वस्त्रसंपन्न देशाविरोधात असं पाऊल उचलता कामा नये होतं, असेही ते म्हणाले.
मेदवेदेव यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सांगितले की, असं होऊ शकतं की, उत्तर समुद्रातून एक हायपरसोनिक रशियन क्षेपणास्त्र हेग स्थित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयावर आदळू शकते. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयातील न्यायाधीशांनी आता आकाशावर लक्ष ठेवावं, अशी धमकीही त्यांनी दिली.
युक्रेनविरोधात युद्ध पुकारणे आणि युक्रेनियन मुलांना डिपोर्ट केल्याने आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंट बजावले आहे. मात्र रशियन सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना ते आयसीसीच्या कार्यकक्षेत येत नाही, असे बजावले आहे.