कीव्ह : रशिया अण्वस्त्रांचा वापर करण्याची शक्यता असून त्याला सामोरे जाण्यासाठी जगाने सज्ज राहावे असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की म्हटले आहे. रशियाबाबत तशी शक्यता अमेरिकेची गुप्तहेर संघटना सीआयएचे संचालक विलियम बर्न्स यांनीही व्यक्त केली होती. दस्तुरखुद्द रशियानेही तशी धमकी याआधी दिली होती.
युक्रेन युद्धातून तिसरे महायुद्ध छेडले जाईल अशी भीती अनेकांच्या मनात आहे. त्याबद्दलच्या प्रश्नावर झेलेन्स्की म्हणाले की, रशिया अण्वस्त्रे कधी वापरेल याची जगाने वाट पाहत बसू नये. तसे होण्याची शक्यता लक्षात घेऊन पुढची पावले उचलली पाहिजेत.
रशियाने अण्वस्त्र वापराबाबत दिलेला इशारा सर्वांनीच गांभीर्याने घेतला पाहिजे, असे सीआयएच्या संचालकांनीही काही दिवसांपूर्वी म्हटले होते.
युक्रेनचे युद्ध सुरू होऊन सात आठवडे उलटले आहेत. रशियाला अपेक्षित असलेला विजय अजूनही मिळालेला नाही. त्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व त्यांचे सहकारी काहीसे निराश झाले आहेत. युक्रेनचे नि:शस्त्रीकरण करण्यासाठी कमी क्षमतेच्या अण्वस्त्रांचा वापर करावा, असे रशियाच्या संरक्षण खात्याच्या कागदपत्रांतही नमूद करण्यात आले होते.
युक्रेनला अमेरिका, नाटो देशांकडून मोठ्या प्रमाणावर मिळणारी लष्करी व आर्थिक मदत थांबवा, असा इशारा रशियाने नुकताच दिला होता. युक्रेनचे युद्ध भविष्यात आणखी तीव्र होईल असे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
स्वीडनला रशियाचा इशारा स्वीडन व फिनलँडने नाटो संघटनेत सहभागी होऊ नये असा इशारा रशियाने दिला आहे. आमचे म्हणणे न ऐकल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील असे रशियाच्या सुरक्षा कौन्सिलचे उपाध्यक्ष दमित्री मेदवेदेव यांनी सांगितले. रशिया आपल्या पश्चिम सीमेवर तैनात सैन्याची संख्या दुप्पट करण्याच्या विचारात असल्याचेही त्या देशाने म्हटले आहे.